यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने यंदाच्या बी.एस्सी. (रसायनशास्त्र) तृतीय वर्षाच्या निकालात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या विज्ञान विभागातील रसायनशास्त्र शाखेतील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट गुणवत्तेची परंपरा कायम राखत घवघवीत यश मिळविले असून, त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकताच जाहीर झालेल्या बी.एस्सी. तृतीय वर्षाच्या निकालात कु. ज्ञानेश्वरी महेंद्र देवरे हिने ७५.६८ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. कु. नेहा विनोद महाले हिने ७२.१८ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर कु. समर्थनी मुकेश येवले हिने ६९.३८ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त करत विशेष प्राविण्य मिळविले. विद्यार्थिनींच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

यशस्वी विद्यार्थिनींचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. एस. आर. गायकवाड, उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, उपप्राचार्य डॉ. एच. जी. भंगाळे, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. डी. पवार तसेच प्रा. आर. एस. शिरसाट यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राध्यापक मिलिंद बोरघडे, प्रमोद कदम, अनिल पाटील यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थिनींचा गौरव केला. विद्यार्थिनींच्या मेहनतीचे कौतुक करत भविष्यातही अशाच प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.



