मोठी बातमी : मार्च महिन्यातच होऊ शकतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका !

मुंबई प्रतिनिधी | एकीकडे सुप्रीम कोर्टाने तात्पुरत्या ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा केला असतांना दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यामुळे राज्यातील नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची निवडणूक ही मार्च महिन्यात होण्याचे संकेत मिळाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर काय काळजी घ्यावी, यासंदर्भात निवडणूक आयोगाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात कोरोनामुळे आता कोणत्याही निवडणुका थांबणार नाहीत, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच मतदान केंद्रावर काय काळजी घ्यावी याबाबत सूचना जारी केल्या आहेत. निवडणूक कर्मचार्‍यांनी त्यासंदर्भात काय उपाययोजना करणे आवश्यक आहे? अगदी एखादा मतदार विनामास्क आला तरी ती परिस्थिती कशी हाताळावी यासंदर्भात माहिती यात देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार प्रभागरचनेतील लोकसंख्येबाबतही यात स्पष्टता देण्यात आली आहे. एका प्रभागात हजार ते दीड हजार लोकसंख्या असावी अशा सूचना निवडणू आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. मुंबईतील प्रभागरचनेचा आराखडा आधीच निवडणूक आयोगापुढे ठेवल्याने ही प्रक्रिया वेगवान होण्याची शक्यता आहे.    मुंबईबरोबरच, पुणे, औरंगाबाद, नाशिक महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. तर नगरपालिका आणि २६ जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने राजकारण तापणार आहे.

 

Protected Content