मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मुक्ताईनगरच्या पुनर्वसनासाठी तब्बल ३८५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून हा विकासातील मोठा टप्पा मानला जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मुक्ताईनगर येथील पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबीत होता. यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांचा पाठपुरावा सुरू होता. याला अखेर फळ आले आहे. आज मुक्ताईनगरमधील ४१३ घरांचा आणि तिसऱ्या टप्प्यातील २२ घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.

आज मुंबई येथे जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन आणि मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत मतदार संघातील विविध गावांच्या पुनर्वसन कामांसाठी सुमारे ३८५ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.
या निधीतून मुक्ताईनगर शहरासह तालुक्यातील भोकरी,पातोंडी, सुलवाडी, कोळोदा, अंतुर्ली, धामणदे,नरवेल,पिंप्री नांदू, बेलसवाडी, मुंडोळदे खडकाचे, मुंढोदे, उचंदा शेमळदे, मेळसांगवे, पंचाणे, खामखेडा, भामलवाडी, शिंगाडी, मांगलवाडी, कांडवेल, तांदलवाडी , पुरी गोलवाडे, घोडसगाव, चिचखेडा बुद्रुक, आंदलवाडी या गावातील रखडलेल्या नागरी सुविधांना गती मिळणार आहे.
आ. चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मुक्ताईनगरचा कित्येक दशकांपासून प्रलंबीत असलेला प्रश्न मार्गी लागल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.



