मोठी बातमी : साडेसात लाखांचा मद्याचा मोठा साठा जप्त; एकावर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावकडून वावडदाकडे जाणाऱ्या वाहनामधून एमआयडीसी पोलिसांनी वावडदा नाका येथे ७ लाख ३४ हजार ४१० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला. ही कारवाई मंगळवारी २२ ऑक्टोबर रोजी रात्री करण्यात आली. या प्रकरणी वाहनचालक संकेत शालिग्राम मालकर (२४, रा. आदर्शनगर, जळगाव) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्य, रोकड व अन्य वस्तूंच्या वाहतुकीवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात आहे. त्यात एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम हे मंगळवारी २२ ऑक्टोबर रोजी रात्री पेट्रोलिंग करीत असताना त्यांना जळगावकडून वावडदाकडे एका वाहनातून (एमएच १९, सीझेड २४४४) बेकायदेशीर मद्याचा साठ्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. त्या वेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वावडदा नाका येथे असलेल्या तपासणी नाक्यावरील पोलिस नाईक गणेश वंजारी, पोकॉ अमोल पाटील, समाजकल्याण विभागाचे निरीक्षक चेतनकुमार साळुंखे यांना या वाहनाच्या तपासणी विषयी सांगितले. तेथे पोलिस निरीक्षक निकम यांच्यासह पोकॉ प्रदीप पाटील, पोकॉ तुषार गिरासे हेदेखील पोहचले.

या वाहनाची तपासणी केली असता वाहनात ७ लाख ३४ हजार ४१० रुपयांचा मद्यसाठी आढळून आला. तो साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहनचालक संकेत मालकर याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content