घरगुती गॅस सिलेंडरमध्ये मोठी दरवाढ

नवी दिल्ली – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा ।  पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा देशात इंधन दरवाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आज घरगुती गॅस सिलेंडरही महागला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली आहे. आज पासून हे नवीन दर लागू होणार आहेत.

पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर आता इंधन दराचा भडका उडाला आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीपाठोपाठ घरगुती गॅस सिलेंडरही महाग झाला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. निवडणूक निकालानंतर इंधन दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मागील वर्षी 6 ऑक्टोबरला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महाग झाला. त्यामुळे महागाईचे चटके सहन करणाऱ्या जनतेला आणखी एक झटका बसला आहे.

काही दिवसांपूर्वी व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढवण्यात आले होते. त्यानंतर आता घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ झाली आहे. मुंबईत आता एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 949.50 रुपये मोजावे लागणार आहेत. कोलकातामध्ये 976 रुपये, तर चेन्नईत 965.50 रुपये इतका दर झाला आहे. लखनऊमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 987.50 रुपये मोजावे लागणार आहे. पाटणामध्ये गॅस सिलेंडरच्या दराने 1000 रुपयांचा आकडा ओलांडला आहे. पाटणामध्ये एलपीजी गॅसचा दर 1039.50 रुपये झाला आहे.

एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने मध्यमवर्गीय आणि सामान्यांचे किचन बजेट बिघडणार आहे. खाद्य तेलाच्या किंमतीत होत असलेले चढ-उतार, भाज्या, धान्याच्या दरवाढीने आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांवर आता गॅस आणि इंधन दरवाढीची कुऱ्हाड कोसळली आहे.

आजपासून देशात पेट्रोल-डिझेल महागलं. तब्बल साडेचार महिन्यानंतर देशात पेट्रोल-डिझेल महागलं आहे. आजपासून पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ होणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू झालेत. उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते.

Protected Content