जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कुरीयरचे पैसे घेवून जाणार्या प्रौढाच्या दुचाकीला मागून ट्रिपल सीट येणार्यांनी लाथ मारली. यात ते खाली कोसळल्याने त्यांच्याकडील ३ लाखांची रोकड असलेली बॅग लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी सोमवारी २५ जुलै रोजी दुपारी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, “शहरातील पिंप्राळा रोड परिसरातील गुड्डूराजा नगरात प्रमोद विठ्ठल घाडगे (वय-५८) हे वास्तव्यास असून त्यांचे कुरीयरचा व्यवसाय आहे. शुक्रवारी २२ रोजी ते नेहमीप्रमाणे कामासाठी घराबाहेर पडले. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घाडगे हे (एमएच १९ पी ९५२१) क्रमांकाच्या दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. परंतु भोईटे नगर रेल्वेगेट बंद असल्याने त्यांनी आपला रस्ता बदलवित प्रभूदेसाई कॉलनी रोडवरील नवसाचा गणपती मंदिराजवळून घरी जात होते.
यावेळी मागून (३३५४) क्रमांकाच्या दुचाकीवर ट्रिपलसीट तरुण आले. त्या दुचाकीवरील मध्यभागी बसलेल्या इसमाने प्रमोद घाडगे यांच्याजवळील बॅग हिसकविण्याचा प्रयत्न केला. घाडगे यांनी त्याला प्रतिकार केला असता, त्या इसमाने घाडगेंच्या दुचाकीला लाथ मारताच प्रमोद घाडगे हे दुचाकीवरुन रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात पडले. व त्यांच्या हातातील ३ लाख रूपये ठेवलेली बॅग लांबविली.
या घटनेत घाडगे गंभीर जखमी झाल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांना तात्काळ जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, दोन दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी सोमवार, दि. २५ जुलै रोजी दुपारी जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार लुटणार्या इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.