साडेबारा लाखांची रोकड लंपास करणारा बोदवडातून अटक; एमआयडीसी पोलीसांची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी व्ही सेक्टरमधील स्वॉमी पॉलिटेक या प्लॅस्टिक मोल्डेड फर्निचर बनविणार्‍या कंपनीतून चोरट्याने 12 लाख 68 हजारांची रोकड लांबविल्याची घटना शुक्रवारी घडली होती. याप्रकरणातील सीसीटीव्हीत कैद झालेल्या चोरट्यास सोमवारी मध्यरात्री एमआयडीसी पोलीसांनी बोदवड येथून अटक केली आहे. एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरविंद अरूण वाघोदे (वय-२२) रा. कोल्ही गोलाद, लिहा बुद्रुक ता. मोताळा जि.बुलढाणा ह.मु. कृष्णा नगर, सुप्रिम कॉलनी असे संशयित आरोपीचे नाव आहे.

अशी आहे घटना
एमआयडीसी व्ही सेक्टरमध्ये व्ही.23 येथे स्वामी पॉलिटेक नावाची कंपनी आहे. दोन शिप्टमध्ये या कंपनीत काम चालते. या कंपनीच्या पहिल्या मजल्यावर ऑफिस असून ऑफिसच्या बाजूला भरत हरिषकुमार मंधान रा. गोदडीवाला हौसिंग सोसायटी मोहाडी रोड यांचे मावसभाऊ वासुदेव उर्फ विक्की विजू पमनानी यांची कॅबीन ओ. या कॅबीनमधील कपाटात फेरीवाल्यांकडून जमा झालेली रोकड ठेवण्यात येते. 1 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजता भरत मंधान व त्यांचा भाऊ वासुदेव पमनानी यांनी तीन ते चार दिवसांपासून फेरीवाल्याकडून जमा झालेली 12 लाख 68 हजार एवढी रोकड कपाटात ठेवली होती. यानंतर दुसर्‍या शिप्टमध्ये काम करणार्‍या कामगारांना सुचना देवून मंधान व त्यांचा भाऊ दोघेही घरी निघून गेले.

ऑफिसबॉयमुळे प्रकार झाला उघड
2 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास कंपनीतील ऑफिसबॉय मिनास सैय्यद याचा फोन आला. त्याने फोनवर ऑफिसमधील ड्रॉवरचे कुलूप तुटलेले तसेच कॅबीनमधील खुर्च्या या अस्ताव्यस्त पडलेल्या असल्याचे सांगितले. त्यानुसार भरत मंधान यांनी भाऊ सागर तसेच विक्की पमनानी यांच्यासमवेत कंपनीत धाव घेतली. यानंतर कॅबीनमध्ये कपाटात कापडी पिशवीत ठेवलेली 12 लाख 68 हजार रुपयांची रोकड तपासली असता, आढळून आली नाही. चोरीची खात्री झाल्यावर मंधान यांनी कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.

सीसीटीव्ही कॅमेर्‍यात अज्ञात चोरटा कैद
6 फुट उंच व शरीराने सडपातळ अनोळखी व्यक्ती तोंडाला माक्स लावलेला हा 2 रोजी पहाटे 2.41 वाजेच्या सुमारास कॅबीनचा स्कू्र ड्रॉयव्हरच्या मदतीने दरवाजा तोडतांना, यानंतर कॅबीनमध्ये उडी मारतांना, यानंतर 3.31 मिनिटांनी पुन्हा परत जातांना दिसून येत असून त्यांच्या हातात रोकड असलेली कापडी पिशवीही दिसून येत आहे. याप्रकरणी भरत मंधान यांच्या फिर्यादीवरुन शुक्रवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, पो.ना. इम्रान सैय्यद, पो.ना. मुदस्सर काझी, पो.कॉ. सचिन पाटील, पो.कॉ. सतिष गर्जे या पथकाला रवाना केले होतो. संशयित आरोपी अरविंद अरूण वाघोदे (वय-२२) रा. कोल्ही गोलाद, लिहा बुद्रुक ता. मोताळा जि.बुलढाणा ह.मु. कृष्णा नगर, सुप्रिम कॉलनी जळगाव हा ४ ऑक्टोबर रोजी बोदवड परिसरातील जंगलात असल्याची माहिती मिळाली. पथकाने मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास अटक केली. त्याच्या ताब्यातील ९ लाख ८ हजार ३०० रूपये हस्तगत करण्यात आले आहे. आज न्यायालयात हजर केले असता ८ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि अमोल मोरे, पोहेकॉ रतीलाल पवार करीत आहे.

Protected Content