भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ स्पोर्ट्स ॲण्ड रनर्स असोसिएशनचे विजय फिरके यांनी १.९ किमी स्विमींग, ९० किलोमीटर सायकलींग आणि २१ किलोमीटर रनिंग अवघ्या नऊ तासाच्या आत पुर्ण केल्याने हाफ आयर्नमॅन किताब देवून गौरव करण्यात आला आहे.
विजय फिरके यांनी केलेल्या कामगिरीने भुसावळ शहराचे नाव देशपातळीवर पुन्हा एकदा मानाने झळकले आहे. ही स्पर्धा त्यांनी ८ तास ४५ मिनिटात पूर्ण केली. वयाच्या ५७ व्या वर्षी अतिशय अवघड स्पर्धा पूर्ण केल्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पुण्याजवळील मंचर भीमाशंकर रोडवर असलेल्या डिंभे धरणात आधी १.९ किमी स्विमिंगची स्पर्धा ठीक सकाळी ७ वाजता माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते उद्घाटन होऊन स्पर्धेस सुरुवात झाली. त्यानंतर ९० किमी सायकलिंगसाठी स्वतःच्या सायकलने पुढे भीमाशंकर रोडवर सर्व स्पर्धक निघाले. त्यानंतर अतिशय चढ उताराच्या रस्त्यावर भर दुपारी १२ वाजता अतिशय उन्हात २१ किमी रनिंगला सुरुवात झाली. अशा प्रतिकूल वातावरणात व अतिशय आव्हानात्मक रस्त्यावर १५० स्पर्धक सदरच्या स्पर्धेसाठी देशभरातून सहभागी झाले होते. त्यापैकी साधारणतः १० स्पर्धक ही स्पर्धा पूर्ण करू शकले नाहीत. दरम्यान आयोजकांतर्फे रस्त्यावर ठिकठिकाणी अल्पोपहार व पाण्याची व्यवस्था केली होती. विजय फिरके हे शहरातील उत्कृष्ट जलतरणपटू असून तापी नदीवर बाराही महिने कितीही थंडी असो वा नदीला पूर असो ते स्विमिंगचा सतत सराव करीत असतात. त्याचबरोबर ते सायकलिंगच्या विविध बीआरएम स्पर्धांमध्ये आतापर्यंत यशस्वी झाले आहेत. त्यामध्ये बडोदा ते कछ हे गुजरात मधील १ हजार किलोमीटर सायकलिंगचा त्यांचा पराक्रम देखील समाविष्ट आहे. शिवाय रनिंगमध्ये विविध ठिकाणच्या मॅरेथॉनमध्ये त्यांनी यशस्वी सहभाग नोंदविलेला आहे. या सततच्या सरावामुळे ते यशस्वी ठरलेत असे प्रा. प्रवीण फालक यांनी सांगितले.
तिन्ही क्रीडा प्रकारांचा सराव असला तरी प्रथमच एकत्रितरित्या एवढ्या मोठ्या स्पर्धेत सहभागी होण्याचे दडपण होते. परंतु यावेळी भुसावळचे नितीन साळुंखे व रघुनाथ महाजन तसेच पुण्याचे तेजस बालाजीवाले व एस.बी. अंगडी या मित्रांनी प्रत्यक्ष स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहून उत्साह वाढविल्याचे वीरेंद्र फिरके म्हणाले. तसेच याप्रसंगी विजय पाटील व पंकज कुलकर्णी यांनी देखील खूप धीर दिला त्यामुळे हे शक्य झाले असे त्यांनी नमूद केले. या यशाबद्दल निळकंठ भारंबे, किरण वाणी, बाबुराव नागरे, दिनेश राणे ,बि. डी. कोल्हे, यादव भारंबे, विजय सरोदे, चंदू पाटील, नरेंद्र भोळे, संजय महाजन व राजेंद्रसिंग खंडाळे यांनी खूप अभिनंदन केले.