कोरोना बाधितांच्या अंत्यविधीसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी- उमेश नेमाडे

भुसावळ प्रतिनिधी । तापी नदीकिनारी असलेल्या स्मशानभूमीत कोरोनाग्रस्त मृतांवर अंत्यविधी केला जात आहे. तथापि, ही जागा तोकडी असल्यामुळे कोरोनाबाधीत मृतदेहांवर स्वतंत्र जागेत अंत्यसंस्कार करावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे केली आहे.

भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना एक निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की, भुसावळ शहराची लोकसंख्या पाहता स्मशानभूमीत दररोज होणार्‍या अंत्यसंस्कारांची संख्या अधिक आहे. कोरोनाबळींची संख्या वाढत असल्याने भुसावळसह परिसरातील सर्वच तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचे मृतदेह या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी आणले जातात. परंतू नैसर्गिकरित्या मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या अंत्यविधीसाठीही नागरिकांना याच स्मशानभूमीत जावे लागते. त्यामुळे नागरिकांना यापासून संसर्गाचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कोरोना बाधित मृतांवर अंत्यसंस्कार होत असल्याने, काहीवेळा नैसर्गिक मृत्यू झालेल्या मृतांच्या नातेवाईकांनी प्रतीक्षा करावी लागते.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, भुसावळ स्मशानभूमी हे तापी नदी पुलाच्या पूर्वेस असून पुलाच्या पश्‍चिमेस मोकळी जागा उपलब्ध आहे. त्या परिसरात कोरोनाग्रस्त मृतांवर अंत्यविधीसाठी स्वतंत्र व्यवस्था करता येईल. तापी नदी पुलाच्या पश्‍चिमेस अनेक वर्षांपासून सातारे गाव परिसरातील मृतदेह अंत्यविधीसाठी आणले जातात. त्यामुळे तिकडे वावर सहज शक्य आहे. त्यामुळे लवकर निर्णय घेऊन ही समस्या सोडवावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Protected Content