भुसावळ प्रतिनिधी | रात्री साडेबारा पर्यंत नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेला गरबा-दांडिया खेळणे बंद करण्याची सूचना पोलिसांनी केल्याने तरूणांच्या जमावाने पोलीस ठाणे पेटवून देण्याची धमकी देत कर्मचार्यांना धक्काबुक्की करण्याचा गंभीर प्रकार शहरात घडला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे.
यंदा कोरोनाच्या आपत्तीमुळे नवरात्र उत्सवासाठी नियमावली आखून देण्यात आलेली आहे. या अनुषंगाने हनुमान नगरातील पंचवटी ग्रुपच्या तकदीर मंडळासमोर सार्वजनिक जागेवर शुक्रवारी रात्री साडेबारा पर्यंत गरबा व दांडिया सुरू होता. दरम्यान, पोलीस स्थानकाचे फौजदार महाजन व त्यांच्या सहकार्यांनी मंडळाच्या पदाधिकार्यांना गरबा बंद करण्याच्या सूचना दिल्या. मात्र त्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले. वरिष्ठांनी देखील याबाबत सूचना करूनही त्यांनी ऐकले तरी नाहीच पण पोलीस कर्मचार्यांना धक्काबुक्की केली.
याप्रसंगी ऋषी शुक्ला याच्यासह इतरांनी पोलीस ठाणे पेटवून देण्याची धमकावणी देत धुडगुस घातला. या अनुषंगाने पोलिस उपनिरीक्षक महाजन यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात धीरज विजयसिंग राजपूत (रा. हनुमान नगर, भुसावळ), किरण भागवत कलाल (रा.साईबाबा मंदिराजवळ, साईशंकर नगर, भुसावळ), ऋषी दुर्गाप्रसाद शुक्ला (रा.हनुमान नगर, भुसावळ) व प्रशांत उर्फ गोलू युवराज ठाकूर (रा.भुसावळ) व तीन अनोळखी अशा सात जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी धीरज राजपूत, किरण कलाल व ऋषी शुक्ला यांना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे. सहायक पोलिस निरीक्षक हरीश भोये पुढील तपास करत आहेत.