भुसावळ-इकबाल खान | आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वत्र हुतात्म्यांचे स्मरण केले जात असतांना भुसावळातील हुतात्मा जवान स्व. नरेंद्र ओंकार महाजन यांचा चिरंजीव स्वराज याने घेतलेली भरारी ही कौतुकास्पद अशीच मानावी लागणार आहे.

हुतात्मा नरेंद्र ओंकार महाजन भुसावळातल्या वेडिमाता मंदिराजवळच्या विद्यानगरातील रहिवासी होते. ते केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात सीआरपीएफमध्ये कार्यरत होते. 11 ऑगस्ट 1999 रोजी मणिपूरची राजधानी असलेल्या इंफाळजवळ दहशतवाद्यांशी लढतांना त्यांना वीरगती प्राप्त झाली. स्व. नरेंद्र महाजन हुतात्मा झाले तेव्हा त्यांचा मुलगा स्वराज हा अवघ्या सात महिन्यांचा होता. त्यांच्या अकाली जाण्यामुळे महाजन कुटुंबावर वज्राघात झाला. मात्र त्यांच्या पत्नी श्रीमती अर्चना महाजन यांनी आपल्या मुलाचे संगोपन अतिशय उत्तम प्रकारे केले. आणि कुशाग्र बुध्दीच्या स्वराजने याचे चीज करत बी. ई. चे शिक्षण पूर्ण केले. यानंतर करियरच्या अनेक संधी उपलब्ध असतांना त्याने नेव्हीत जाण्याचा निर्णय घेतला. आणि आज तो एलएनजी या जहाजावर मुख्य अभियंता म्हणून कार्यरत आहे. या माध्यमातून त्याने आपल्या वडिलांचा धाडसाचा वारसा नेटाने पुढे नेला आहे.
जाणून घ्या एलएनची जहाजाची माहिती !
LNG FSRU फ्लोटिंग स्टोरेज अँड रिगॅसिफिकेशन युनिट्स (एफएसआरयू) हे जहाजे द्रवीभूत नैसर्गिक वायू (एलएनजी) वहन करतात, जो की जगातील सर्वात मौल्यवान वस्तूंपैकी एक आहे. ही जहाजे अभियांत्रिकीचा चमत्कार आहेत, जे समुद्रावर एलएनजी साठवण्यासाठी आणि पुन्हा वायुरूप करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत, ज्यामुळे किनारपट्टीच्या पायाभूत सुविधा नसलेल्या प्रदेशांमध्ये ते उपलब्ध होते.
या जहाजांवर -162°C (-260°F) च्या अत्यंत कमी तापमानात नैसर्गिक वायू साठवला जातो. एफएसआरयूवर काम करणे अत्यंत धोकादायक आणि धोकापूर्ण आहे. एलएनजी अत्यंत ज्वलनशील आहे आणि अत्यंत कमी तापमानात कार्य करते, ज्यामुळे सुरक्षा प्राधान्य बनते. या महत्त्वपूर्ण ऑपरेशन्ससाठी फक्त जगातील सर्वात प्रतिभावान आणि कौशल्यवान अभियंत्यांनाच विश्वास ठेवला जातो. जगभरात फक्त ४७ एफएसआरयू उपलब्ध आहेत. सद्यस्थितीत स्वराज नरेंद्र महाजन हा एलएनजी जहाजाच्या मोठ्या असाईनमेंटवर बांगलादेशात सेवारत आहे.
दरम्यान, आज प्रजासत्ताक दि नाचे औचित्य साधून लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी वार्तालाप करतांना त्याने नेव्हीत अनेक संधी उपलब्ध असून यात चांगले करियर शक्य असल्याचे आवर्जून नमूद केले. आपल्या वडिलांची पुण्याई आणि आईच्या आशिर्वादामुळे आपण येथवर असल्याचे देखील तो म्हणाला.