संतोषभाऊ नंतर नाथाभाऊ : आ. संजय सावकारेंनी दिला ‘असा’ जबर धक्का !

भुसावळ Bhusawal-इकबाल खान ( एक्सक्लुझीव्ह रिपोर्ट ) | भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी राष्ट्रवादीच्या पाच मातब्बर शिलेदारांना भाजपमध्ये परत आणून एकीकडे आपल्यासह पक्षाची स्थिती भक्कम करतांनाच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांना देखील जबर धक्का दिला आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीतील तिसर्‍या टप्प्यात प्रवेश करतांना आमदार सावकारेंनी संतोष चौधरी यांच्या पाठोपाठ एकनाथ खडसे यांना बायपास करत आगेकूच करण्याचे स्पष्ट संकेत देखील यातून दिले आहेत.

(Image Credit Source: Live Trends News )

आपल्या मराठीत दैव देते आणि कर्म नेते अशी एक म्हण आहे. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या बाबतीत मात्र दैव पुन्हा-पुन्हा देते आणि कर्म पुन्हा पुढे नेते ! असा प्रकार घडला आहे. खरं तर काळाची पावले ओळखण्यात जे काही मोजके नेते यशस्वी झालेत त्यात आमदार संजय वामन सावकारे यांचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागेल. भुसावळच्या सब्जी मंडी परिसरातून शहरच नव्हे तर तालुक्याचे राजकारण गाजविणारी एक पिढी समोर आली. याच सब्जी मंडीला लागून असणार्‍या परिसरात जन्मलेले प्रमोद आणि संजय हे सावकारे बंधू तसे आधीपासूनच प्रचंड महत्वाकांक्षी होते.

अभियंता बनल्यानंतर संजय सावकारेंनी नगरपालिकेत नशीब आजमावल्यावर त्यांना अपयश आले. यामुळे त्यांनी राजकारणाचा नाद सोडून नोकरीवर लक्ष केंद्रीत केले. तर त्यांचे बंधू प्रमोद सावकारे हे चौधरी बंधूंच्या सोबतीचे राजकारणात सक्रीय झाले. २००४ साली संतोष चौधरी आमदार बनल्यानंतर त्यांनी कुशाग्र बुध्दीची पारख करत संजय सावकारे यांना स्वीय सहायक बनविले. ते संतोषभाऊंचे खासमखास बनले. याचमुळे भुसावळ विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर त्यांनी संजय सावकारे यांना २००९ साली राष्ट्रवादीतर्फे तिकिट देऊन त्यांना निवडून देखील आणले.

यानंतरच्या कालखंडात मात्र चौधरी बंधू आणि सावकारे बंधूंमध्ये दुरावा आला. एकीकडे संतोष आणि अनिल चौधरींवर एकामागून एक संकटे येत असतांना आमदार असणारे संजय सावकारे हे आपल्या मदतीला येत नसल्याचे पाहून चौधरी बंधू संतापले. तर सावकारेंनी मात्र जनतेत आपली प्रतिमा जपण्याला प्राधान्य दिले. अर्थात दोन्ही बाजूंमध्ये दुरावा आला. २०१४ साली विधानसभा निवडणुका आल्यानंतर सावकारेंनी नाथाभाऊंची साथ घेत भाजपमध्ये प्रवेश केला. अर्थात, त्यांचा विजय सोपा झाला. २०१६ साली नाथाभाऊंवर गंडांतर आल्याने त्यांचे मंत्रीपद गेले. नाथाभाऊंच्या मानहानीच्या आणि अडचणींच्या काळामध्ये संजय सावकारे हे उघडपणे त्यांच्या सोबत राहिले. खडसेंचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख झाली.

यानंतर २०२१च्या ऑक्टोबर महिन्यात मात्र नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हापासून आमदार संजय सावकारे आणि एकनाथराव खडसे यांच्यात दुराव्यास प्रारंभ झाला. अवघ्या काही महिन्यातच तत्कालीन नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह १९ आजी-माजी नगरसेवकांनी नाथाभाऊंसोबत राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्यानंतर मात्र दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा अजून वाढला.

आमदार संजय सावकारेंनी आपल्या समर्थक महिला नगरसेविकेच्या माध्यमातून खडसे समर्थक माजी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह १० नगरसेवकांना अपात्र करण्याची तक्रार केली. यातून ते अपात्र देखील झालेत. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतांनाच कालच पुरूषोत्तम नारखेडे, प्रमोद नेमाडे, दिनेश नेमाडे, अनिकेत पाटील आणि बोधराज चौधरी यांनी भारतीय जनता पक्षात घरवापसी केली. हा नक्कीच एकनाथराव खडसे यांना धक्का आहे.

यात योगायोगाची बाब अशी की, प्रमोद नेमाडे व बोधराज चौधरी हे स्वत: तसेच पुरूषोत्तम नारखेडेंच्या सौभाग्यवती आणि दिनेश नेमाडेंच्या मातोश्री यांच्यावर आमदारांच्याच गटाने अपात्रतेची कारवाई केली आहे. यामुळे आगामी काळात या सर्वांच्या मागील अपात्रतेचे लचांड सुटून ते मुक्तपणे निवडणुका लढवू शकतील अशी तजवीज या पक्षांतरातून करण्यात आल्याची बाब उघड आहे.

पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत संजय सावकारे हे चौथ्यांदा जनतेचा कौल मागणार आहेत. त्यांच्यासाठी सर्वात मोठा समर्थक समूह हा अर्थातच लेवा पाटीदार समाजाचा होय. मध्यंतरी संजय सावकारेंनी जाणून-बुजून लेवा समाजाच्या नगरसेवकांना टार्गेट केल्याची चर्चा सुरू झाली होती. या आरोपांना पूर्णविराम देतांनाच आपली व्होट बँक मजबूत करण्यासाठी सावकारे यांनी याच समाजातील दुसर्‍या फळीतल्या पदाधिकार्‍यांना आपल्याकडे खेचून घेतले.

या पक्ष प्रवेशाचा लाभ होणार आहे. या आधीच किरण कोलते आणि देवा वाणी हे संजय सावकारे यांच्या सोबत आले होते. या पाठोपाठ काल लेवा समाजातील प्रबळ पदाधिकारी सावकारे यांच्या सोबतीला आल्याने आगामी नगरपालिका निवडणुकीत देखील ते मजबूत स्थितीत वाटत आहेत. म्हणजेच विधानसभा निवडणुकीप्रमाणेच नगरपालिका निवडणुकीतही आमदार संजय सावकारे हे लेवा पाटीदार समाजाचे पाठबळ मिळवणार असल्याचे देखील या घरवापसी कार्यक्रमातून दिसून आले आहे.

सर्वात शेवटी प्रश्‍न उरतो असा की, संजय सावकारे यांनी ज्या प्रकारे पहिल्यांदा संतोष चौधरी यांची साथ सोडली, तशीच आता एकनाथराव खडसे यांची सोडली का ? तर याचे उत्तर आजच स्पष्टपणे देता येणारे नाही. कारण या दोन्ही नेत्यांमधील वैयक्तीक संबंध फार सलोख्याचे आहेत. तथापि, जे काही समोर घडतेय ते पाहता एकाच वेळी नाथाभाऊ आणि संतोषभाऊ या दोन तुल्यबळ नेत्यांशी दोन हात करत विधानसभा व अन्य निवडणुकांना सामोरे जाण्याची मानसिकता आमदार संजय सावकारे यांनी केल्याचे दिसून येत आहे.

चौधरी आणि खडसे हे दोन्ही मान्यवर एकत्र आले तर आपल्याला तगडे आव्हान उभे करतील हे माहित असून देखील संजय सावकारेंनी ही पावले उचलली, याचाच अर्थ असा की, त्यांनी अगदी खर्‍याखुर्‍या स्वबळाची तयारी केली आहे. यात पुढे नेमके काय होणार याचे उत्तर तर काळच देणार आहे. तथापि, पहिल्यांदा संतोष चौधरी तर आता एकनाथराव खडसे यांच्यावरील अवलंबीत्व दूर सारत संजय सावकारे यांनी नवीन स्वतंत्र मार्ग निवडल्याची बाब कुणालाच नाकारता येणार नाही. मात्र राजकीय धक्का हा धक्काच असतो. . .सावकारेंनी आधी संतोष चौधरी आणि आता एकनाथराव खडसे यांना जोरदार धक्का दिले हे कुणालाच अमान्य करता येणार नाही.

व्हिडीओत पहा : खडसे समर्थकांची भारतीय जनता पक्षात घरवापसी !

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/768955038319469

Protected Content