भुसावळ प्रतिनिधी | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी सर्वपक्षीय पॅनलमध्ये रिपाइं आठवले गटाला एक जागा देण्यात यावी, अन्यथा पक्ष स्वतंत्र निवडणूक लढविणार असल्याची माहिती पक्षातर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
रिपाइं आठवले गटाचे युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र सपकाळे, खान्देश प्रभारी अध्यक्ष लक्ष्मण जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन जेडीसीसी बँकेच्या आगामी निवडणुकीबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली.
रिपाइं आठवले गटाची भाजपसोबत युती आहे. मात्र, जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत रिपाइंला निमंत्रण देण्यात आले नाही. यामुळे रिपाइंला किमान एक जागा द्यावी अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली. अन्यथा सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने जिल्हा बँकेची निवडणूक रिपाइं आठवले गट स्वबळावर लढवेल, असे रवींद्र सपकाळे यांनी सांगितले. जिल्हा बँकेत किमान एक जागा मिळावी. अन्यथा आम्ही बँकेच्या सोबतच पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये देखील स्बवळावर लढू, असा इशारा देखील याप्रसंगी सपकाळे यांनी दिला.
याबाबत माजी मंत्री गिरीश महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, खान्देश प्रभारी अध्यक्ष लक्ष्मण जाधव व सर्व पदाधिकारी पत्र देवून चर्चा करणार असल्याची माहिती देखील याप्रसंगी देण्यात आली.