मुंबई, वृत्तसेवा। बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळताना दिसत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या या पोटनिवडणुकीत महायुतीकडून बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असताना काँग्रेसने मात्र उमेदवार देण्याची भूमिका घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्यापर्यंत उमेदवार जाहीर करू, असे स्पष्ट केल्यामुळे निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडींमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून पाठिंबा देण्याचे आवाहन केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, मुंबईतील मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत खासदार संजय राऊत यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या पाठिंब्याच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे समजते.
सूत्रांच्या माहितीनुसार, बारामती पोटनिवडणुकीत ठाकरे गटाकडून काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा न देता सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे आणि पवार कुटुंबीयांमधील जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेता हा निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही सांगितले जात आहे.
जर काँग्रेसने आपला उमेदवार रिंगणात उतरवला, तर महाविकास आघाडीतील मतभेद उघड होण्याची शक्यता असून, याचा निवडणुकीवर थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
उद्धव ठाकरे स्वतः पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात अधिकृत भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती समोर येत असून, राज्यातील राजकारणात पुढील काही दिवसांत आणखी नवे वळण येण्याची शक्यता आहे.



