भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणार्या सेवानिवृत्त शिक्षकाला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणाचा परिसरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे.
भुसावळ शहरात विद्यार्थी-शिक्षकाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर ७५ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाने अत्याचार केले. या प्रकरणी जयंत जोसेफ रायन (वय ७५, रा.भुसावळ) याच्याविरूद्ध अत्याचारासह पोस्कोचा गुन्हा दाखल झाला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित १२ वर्षीय विद्यार्थिनी भुसावळ शहरातील एका नामांकित शाळेत पाचवीचे शिक्षण घेते. तिने रायनकडे शिकवणी लावली आहे. गुरुवारी (दि. ३) जयंत रायन याने पीडितेच्या आईला फोन करून ४ मार्चला विद्यार्थिनी व तिच्या एका मैत्रिणीला शिकवणीसाठी लवकर बोलावले. शिकवणी झाल्यावर त्याने दोघांना थांबवून ठेवले. येथे कपल डान्स केल्यानंतर एकीवर अत्याचार केला. दुसर्या दिवशी ५ मार्चला पुन्हा हाच प्रकार पीडितेच्या एका मैत्रिणीसोबतही केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
१२ वर्षीय पीडितेने तिच्या आईला प्रकार सांगितला. त्यांनी बाजारपेठ पोलिस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला. आरोपी जयंत रायन याला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली.
दरम्यान, जयंत रायन याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने रायन याला ९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.