भुसावळातील आनंद नगर परीसरात नवीन अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी

bhusawal newss

भुसावळ प्रतिनिधी । आनंद नगर परीसरात अग्निशमन केंद्राची उभारणी करण्यासाठी भुसावळ पालिका मुख्याधिकारी यांच्याशी शिवसैनिकांनी भेट घेवून परीसरातील गांभीर्याचे लक्षात आणून दिले. याप्रकरणी मुख्याधिकारी यांनी देखील लवकरात लवकर अग्निशमन विभाग सुरू करण्याचे आश्वासन दिले.

भुसावळ येथील आनंद नगर परिसरात अग्निशमन केंद्र अस्तित्वात होते. ते आता तापीनगर, यावल रोड परीसरात हलवण्यात आले आहे. वरणगांव रोड, जामनेर रोड, खडका रोड, वांजोळा रोड, आठवडे बाजार परिसरात आग लागल्यास त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. कारण जळगावरोड मार्गे घटनेच्या ठिकाणी दलाची गाडी पोहचते. काही वर्षांपूर्वी अग्निशमन केंद्रासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. त्यानंतर अग्निशामक गाडीची खरेदीही झाली. या केंद्रांमध्ये कार्यालय, कर्मचाऱ्यासाठी विश्रामगृह, चोवीस तास पाणी उपलब्ध करून देणाऱ्या पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. या विभागासाठी कुशल कर्मचाऱ्याची भरती झाली. सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असतानाही अग्निशमन केंद्रांची दैन्यावस्था झाली आहे. परिसराला अस्वच्छतेचा विळखा पडला आहे. भुसावळ शहरातील शिवसैनिकांनी आज १३ डिसेंबर रोजी येथे भेट दिली.

या ठिकाणी अग्निशमन केंद्र पुन्हा सुरू झाल्यास शहराच्या कुठल्याही भागात आग लागली, तरी त्या-त्या कार्यालयाशी संपर्क साधून त्या ठिकाणी पोहोचणे शक्य होईल व मोठे नुकसान टाळता येईल. पालिकेचे अग्निशमन केंद्र शहरातील आग आटोक्यात आणण्याबरोबरच पाणीवाटपाचंही काम करत आहे. या विभागात आग विझवण्याचे प्रशिक्षण घेवून आलेल्या कर्मचाऱ्यांना अग्निशमनची जुनी गाडी घेवून भागात पाणीवाटपासाठी जावं लागत आहे. कुणी कुठलं काम करावं याला तारतम्यच राहिलेलं नाही. केडर दर्जाचे अधिकारी येवूनही कारभारात सुधारणा झाली, असे म्हणणे धाडसाचे ठरणार आहे.

भुसावळ नगरपालिका सभेत केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव घेण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्याशी संपर्क साधून केली आहे. भुसावळ मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी त्वरित एक गाडी दुरुस्त करून आनंद नगर भागातून सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. शहरातील सर्व आपात्कालीन मदत केंद्राची परिस्थिती सुधरावी, कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी भविष्यात शिवसेनेतर्फे आंदोलने केले जातील असा इशारा देण्यात आला आहे. शिवसेना शहर प्रमुख बबलू ब-हाटे, उपशहरप्रमुख पवन नाले, अमोल कोळंबे, हर्षल चौधरी, तेजस तिवारी, बाळा ढाके हे आनंद नगर अग्निशमन दल कार्यालयात उपस्थित होते.

Protected Content