डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग हस्तांतरणाला विरोध

भुसावळ प्रतिनिधी | शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाला रेल्वेकडे हस्तांतरीत करण्याच्या प्रस्तावाला विरोधकांनी प्रखर विरोधाची भूमिका घेतली असून आजच्या शेवटच्या सभेत यावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे.

भुसावळ पालिकेची या पंचवार्षिकमधील शेवटची सर्वसाधारण सभा आज होत आहे. या अनुषंगाने विरोधी राष्ट्रवादीने पत्रकार परिषद घेऊन एका प्रस्तावला विरोधाची भूमिका जाहीर केली आहे. आजच्या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाचे रेल्वेकडे हस्तांतरण करण्यासंदर्भात विषय क्रमांक १६९ घेण्यात आला आहे. हा विषयास विरोध असल्याने तो तहकूब करण्यात यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ नगरसेवक उल्हास पगारे यांनी दिला.

यावेळी उल्हास पगारे यांनी सांगितले की, रेल्वे विभागाने नोव्हेंबर २०१८ मध्ये कोच फॅक्टरीच्या कामाचे कारण देवून अतिक्रमण हटवले होते. मुळात रेल्वे विभागाने राबवलेली अतिक्रमण मोहिमच बेकायदेशीर आहे. या संदर्भात दुकानदारांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. तर, बेघरांचे तीन वर्ष उलटूनही पूर्नवसन करण्यात आले नाही. खरं तर, रेल्वेने अतिक्रमण काढले त्यावेळी पालिकेने हस्तक्षेप केला असता तर अतिक्रमण निघाले नसते, मात्र पालिकेने तेव्हा केवळ बघ्याची भूमिका घेतली. यामुळे अनेकांवर अन्याय झाला. आता हा रस्ता रेल्वेकडे दिल्यास वहिवाटीचे रस्ते बंद होऊन कंडारी गाव, व्दारकानगर, नालंदानगर, कवाडेनगर यासह परिसरातील अनेक भागांतील रहिवाशांना वापरण्यासाठी रस्ताही राहणार नाही, असेही उल्हास पगारे यांनी सांगितले. हा रस्ता रेल्वेकडे दिल्यास वहिवाटीचे रस्ते बंद होऊन कंडारी गाव, व्दारकानगर, नालंदानगर, कवाडेनगर यासह परिसरातील अनेक भागांतील रहिवाशांना वापरण्यासाठी रस्ताही राहणार नसल्याने आपला यास विरोध राहणार असल्याची भूमिका उल्हास पगारे यांनी स्पष्ट केली.

या पत्रकार परिषदेस गटनेते दुर्गेश ठाकूर, गटनेते उल्हास पगारे, नगरसेवक राहुल बोरसे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र निकम उपस्थित होते.

Protected Content