भुसावळ तालुक्यातून पुन्हा एक गुन्हेगार हद्दपार

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिंप्रीसेकम येथील अजय प्रकाश तायडे याला जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

तालुक्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांना हद्दपार करण्याचा सपाटा लावला आहे. यात पुन्हा एकाला हद्दपार करण्यात आले आहे. तालुक्यातील उपद्रवींच्या हद्दपारीचे प्रस्ताव प्रांताधिकार्‍यांकडे पोलिस प्रशासनाने पाठवले आहेत. त्यानुसार तालुक्यातील पिंप्रीसेकम येथील अजय प्रकाश तायडे याला जिल्ह्यातून एक वर्षासाठी ंहद्दपार करण्यात आल्याचे आदेश प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी जारी केले आहेत.

अजय तायडे याच्या विरोधात भुसावळ तालुका पोलिसात कलम ३७९ नुसार चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. २०१५ मधील गुन्ह्यात त्याला चार हजार रुपये दंडाची शिक्षाही न्यायालयाने सुनावली होती. तर हद्दपार चौकशी प्रकरणाची सुनावणी सुरू असताना संशयीताविरोधात नव्याने एक चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. तालुका पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण यांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. डीवायएसपी वाघचौरे यांच्याकडे या प्रस्तावाची चौकशी झाल्यानंतर हा प्रस्ताव प्रांतांकडे रवाना करण्यात आला होता. यानंतर आता प्रांताधिकार्‍यांनी याला मंजुरी दिल्यामुळे तायडे याला हद्दपार करण्यात आले आहे.

Protected Content