सुसरी शिवारातील तीनशे केळीचे घड कापून फेकले

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील सुसरी येथील शिवारात असणार्‍या शेतातील तीनशे केळीचे घड कापून फेकल्याची घटना घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुसरी शिवारातील गट नं. २००-१ या साडेचार एकर शेतातील तीनशे केळीचे घड कापून फेकली व जलवाहिनी फोडून प्रचंड नुकसान करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. सुसरी शिवारात चंद्रशेखर झोपे यांचे शेत आहे. त्यांच्या साडेचार एकर शेतात सात हजार केळीची झाडे लावलेली आहेत. अज्ञात व्यक्तीने तीनशे च्या आसपास केळीचे घड कापून फेकले आहेत. त्यामुळे त्यांचे एक लाखापेक्षा जास्त नुकसान केले आहे. तसेच शेतातील पाणीपुरवठा करणारी जलवाहीनी देखील तोडून फेकली आहे. त्यामुळे शेतातील पाणीपुरवठा देखील करता आला नाही. दुसर्‍या घटनेत सुसरी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहीरीवरील विजपुरवठा करणार्‍या केबल देखील चोरी झाली आहे. या परिसरात शेतकर्‍यांना केबल, मोटारी, पाण्याचे स्प्रींकलर, मोटार सुरू करण्याचे स्टार्टर यासह इतर साहित्याची नेहमीच चोरी होत असते. याबाबत पोलीसांनी तपास करण्याची मागणी होत आहे.

या प्रकरणी वरणगाव पोलीसात अज्ञात आरोपींच्या विरूध्द गुन्हा दाखल असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिपकुमार बोरसे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर पाटील करीत आहेत.

Protected Content