दुकान मालकांच्या धमक्यांमुळे तरूणाचा बळी : तिघांविरूध्द गुन्हा !

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील भारती ज्वेलर्स दुकान मालकांच्या त्रासाला कंटाळुन काम सोडल्यावर त्यांनी दिलेल्या धमक्यांमुळे एका युवकाने आत्महत्या केल्या प्रकरणी या दुकानाच्या तिन्ही मालकांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, आज शहरातील कासार गल्लीतील रहिवासी किशोर सैतवाल (जैन ) या ४० वर्षे वयाच्या तरूणाने गळफास लाऊन आपली जीवनयात्रा संपविली. गेल्या काही दिवसांपासून तो सातत्याने तणावात असून यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली होती.

दरम्यान, मयताची आई रत्नाबाई बाबूराव सैतवाल यांनी आज पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यात त्यांनी आपल्या मुलाच्या आत्महत्येसाठी तो आधी काम करत असलेल्या तीन मालकांना जबाबदार धरल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की रावेर शहरातील कासार गल्लीतील रहीवासी (मयत) किशोर सैतवाल वय ४० हा शहरातील भारती ज्वेलर्स मध्ये काम करत होता.त्याने या ज्वेलर्स मधुन काम सोडले होते. याच कारणा वरुन भारती ज्वेलर्सचे मालक करण गणवानी, अनुराग गणवानी आणि महेश गनवाणी हे त्याला सातत्याने धमकावत होता.

हे तिन्ही जण दि २२ मार्च २०२३ ते दि २७/१०/२०२३ या दरम्यान किशोर यास वेळो-वेळी मोबाईल वर तसेच प्रत्यक्ष घरी जाऊन मयताचा भाऊ आई यांच्या मोबाईलवर तसेच काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन आमच्याकडे कामाला परत ये नाही तर तुझ्यावर चोरीचा आरोप ठेऊन समाजात बदनाम करू व तुला कुठेही काम मिळवु देणार नाही अशी धमकी देत होते. तसेच त्यांनी अलीकडेच किशोर याच्या घरा जवळ येऊन मारहाण देखील केली होती. यामुळेच भारती ज्वेलर्सच्या तिघा मालकां कडून होणार्‍या त्रासाला कंटाळुन किशोर याने घराच्या छतास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याबाबत मयताची आई रत्नाबाई बाबूराव सैतवाल यांनी देलेल्या फिर्यादी वरुन भारती ज्वेलर्सच्या तिघे मालक अर्थात करण गणवानी, अनुराग गणवानी आणि महेश गनवाणी यांच्या विरोधात रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन नवले आणि पो. कॉ. संभाजी बिजाग़रे हे करीत आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Protected Content