भुसावळ प्रतिनिधी । जागतिक महिला दिनानिमित्त भुसावळ स्पोर्टस अँन्ड रनर्स असोसिएशनतर्फे या वर्षीदेखील ७ मार्च रोजी शहरातील महिलांसाठी ‘बीसारा लेडीज इक्वालिटी रन’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची तयारी म्हणून प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त भुसावळ स्पोर्टस अँन्ड रनर्स असोसिएशनतर्फे यावर्षीदेखील ७ मार्च रोजी शहरातील महिलांसाठी ‘बीसारा लेडीज इक्वँलिटी रन’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी नाव नोंदणी ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली असून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या रनमध्ये सहभागी महिला स्पर्धकांना धावण्याचा सराव व्हावा या उद्देशाने गुरुवार दिनांक ४ फेब्रुवारीपासून मोफत ट्रेनिंग सेशन सुरू करण्यात येणार आहेत.
ज्येष्ठ महिला स्पर्धक डॉ. छाया चौधरी या इतर ज्येष्ठ महिला व तरुणींच्या उपस्थितित या प्रशिक्षणास प्रारंभ करण्यात येणार आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक महिला घरीच असून त्यांचा धावण्याचा वा पायी फिरण्याचा सराव बंद आहे.त्याशिवाय धावताना वा धावल्यानंतर कुठलीही इजा होऊ नये याची खबरदारी घेणे देखील आवश्यक असते. त्यामुळे भुसावळ रनर्सतर्फे दर मंगळवार, गुरुवार व रविवार या दिवशी मोफत मार्गदर्शन करण्यात येईल.
या प्रशिक्षणामध्ये धावण्याआधी वॉर्म अप, तीन ते पाच किलोमीटर धावण्याचा सराव व धावल्यानंतर आवश्यक असलेली स्ट्रेचिंगचा व्यायाम प्रकार यांचा समावेश असेल. धावतांना नवीन सहभागी स्पर्धकांना अचूक मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने भुसावळ रनर्सच्या महिला धावपटू या नवोदित स्पर्धकांसोबत धावण्याचा सराव करतील. त्यामुळे एखाद्या स्पर्धकाची धावण्याची पद्धत अथवा इतर काही चुकत असल्यास त्याच वेळी त्या स्पर्धकाकडून आवश्यक सुधारणा करून घेता येईल.
दर मंगळवार, गुरुवार व रविवार रोजी सकाळी ५:४५ वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान (डि.एस.ग्राउंड) वर त्यासाठी जमावे असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे. यामध्ये ५:४५ ते ६:०० वॉर्मअप व्यायाम प्रकार, ६:०० ते ६:४५ धावण्याचा व चालण्याचा सराव व ६:४५ ते ७:०० स्ट्रेचिंगचा समावेश असेल. वॉर्म अप व स्ट्रेचिंग सरावासाठी भुसावळ रनर्समधील योग शिक्षिका पुनम भंगाळे, ज्योत्स्ना पाटील व पुनम कुलकर्णी मार्गदर्शन करतील तर धावण्याच्या सरावासाठी मिना नेरकर,कंगना मनवानी, कृपा मूलचंदानी, डॉ. शितल चोरडिया, संजीवनी लाहोटी, सीमा पाटील, स्वाती फालक, सरोज शुक्ला, चारुलता अजय पाटील या महिला धावपटू मार्गदर्शन करतील.
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक महिला स्पर्धकाने धावण्याआधी व धावल्यानंतर मास्क, सॅनिटायझर व शारीरिक अंतर या त्रिसूत्रीच्या पालन करणे बंधनकारक असेल. शिवाय यावर्षी मर्यादित प्रवेशिका असल्यामुळे लवकर ऑनलाइन नाव नोंदणी https://bit.ly/36mn1Gy या लिंक वर करावी अशी माहिती संयोजिका डॉ. नीलिमा नेहेते व डॉ. चारुलता पाटील यांनी कळविली आहे.