भुसावळ प्रतिनिधी । एकीकडे प्रशासकीय प्रयत्नांनी कोरोना आटोक्यात आल्याचे चित्र असतांना दुसरीकडे काही ठिकाणी अनास्थेमुळे याच्या संसर्ग वाढीला चालना मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे. असाच एक प्रकार भाजप वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ नि. तु. पाटील यांनी उघड केला आहे. भुसावळातील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये ३३ रूग्णांचे स्वॅब हे गेल्या पाच दिवसांपासून तेथेच पडून असल्याचे त्यांनी उघड केल्याने खळबळ उडाली आहे.
भाजप वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ नि. तु. पाटील यांनी अलीकडे आपल्या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर या क्षेत्रातील गैरप्रकारांविरूध्द प्रखरतेने आवाज उठविला आहे. यात आता त्यांनी प्रशासकीय भोंगळपणा उघडकीस आणला आहे.
भुसावळातील कोरोनाच्या संशयित रूग्णांचे स्वॅब हे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये घेतले जातात. येथून हे नमुने जळगाव येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतात. तेथून आलेल्या अहवालानुसार संबंधीत रूग्णांना पुढील उपचारांचे निर्देश दिले जातात. गेल्या काही महिन्यांपासून ही प्रणाली कार्यरत आहे. तथापि, अलीकडच्या काळात स्वॅब रिपोर्टचे अहवाल येण्यासाठी विलंब होत असल्याने काही रूग्णांनी डॉ. नि. तु. पाटील यांच्याशी संपर्क साधला. यातून त्यांनी या प्रकरणाचा शोध घेतला असता धक्कादायक वास्तव समोर आले.
भुसावळातील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये २९ ऑक्टोबरला संकलित पाच नमुने, ३० ऑक्टोबरचे ११ नमुने, ३१ ऑक्टोबरचे तीन, १ नोव्हेंबरचे १० नमुने, २ नोव्हेंबरचे तीन व ३ रोजी दुपारपर्यंत घेतलेला एक स्वॅब असे ३३ नमुने पडून आहेत. यात न.पा. दवाखान्यास अन्य आरोग्य केंद्रात स्वॅब नमुन्यांचा समावेश आहे. हे सर्व स्वॅब ट्रॉमा केअर सेंटरमध्येच पडून असल्याचा गौप्यस्फोट डॉ. नि. तु. पाटील यांनी स्टींग ऑपरेशनद्वारे घेतलेल्या एका व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे.
हा प्रकार अतिशय गंभीर असाच आहे. रूग्णांची चाचणी वेळेवर होऊन त्यांच्यावर योग्य वेळेत उपचार झाल्यास कोरोना हा आटोक्यात येऊ शकतो. तथापि, विलंब झाल्यास रूग्णाच्या प्राणावर देखील बेतण्याची शक्यता असल्याचे आधीच अनेकदा अधोरेखीत झालेले आहे. यापेक्षा भयंकर बाब म्हणजे जोवर उपचार होत नाही तोवर रूग्णाच्या माध्यमातून इतरांना संसर्ग होण्याचा धोका देखील असतोच. याबाबत भुसावळचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देवर्षी घोषाल यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. तर डॉ. नि.तु. पाटील यांनी भाजपची वैद्यकीय आघाडी अशा प्रकारचे कोणतेही प्रकार खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे.