दुकानात चोरी करणारा आरोपी अटकेत

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील मॉडर्न रोडवरील इलेक्ट्रॉनिकच्या दुकानातून चोरी करणार्‍या आरोपीला बाजारपेठ पोलिसांनी गजाआड केले आहे.

याबाबत वृत्त असे की, सुरेंद्र वालवाणी (रा. हनुमान नगर भुसावळ) यांच्या भुसावळ शहरातील मॉडर्न रोड वरील हरी ओम इलेक्ट्रॉनिक दुकानातून दिनांक १७.०७.२०२० रोजी रात्री अज्ञात आरोपी त्यांनी दुकानाचे शेटरला लावलेले कुलूप तोडून आत प्रवेश करून २,२६,३५० रूपयांचा माल चोरीस गेला होता. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकात पो स्टे भाग ५ गुरनं ०७३९/२०२० भा द वि कलम-४५४,४५७, ३८० प्रमाणे दिनांक १८.०७.२०२० रोजी २०.३५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, या गुन्ह्यात अहमद उर्फ अटॅक बशीर खान (वय-२४, रा. जाम मोहल्ला भुसावळ) याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र तो तेव्हापासून फरार झाला असल्याने पोलीस त्याच्या मागावर होते. हा आरोपी भुसावळात आला असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना मिळाली होती. त्यांनी यानुसार बाजारपेठ पोलिसांच्या पथक पाठवून त्याला गजाआड केले आहे.

संबंधीत आरोपीच्या विरुद्ध अनेक गुन्हे आधीच दाखल आहेत. यात तो लोहमार्ग खंडवा स्थानकाच्या स्थायी वॉरंट (पकड वॉरंट) २०९/२०१८ भा द वि कलम-३९७,३९३,४१२ वगैरे मधील जबरी चोरी मध्ये फरार आहे.
आता मात्र त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. ही कार्यवाही सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल मोरे, पो ना रविंद्र बिर्‍हाडे,समाधान पाटील, पो का विकास सातदिवे,ईस्वर भालेराव यांनी केली आहे.

Protected Content