भुसावळात कोविड केअर सेंटर्स सुरु करा- कोठारींची मागणी

भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन शहरातील कोविड केअर सेंटर्स आधीप्रमाणे सुरू करण्यात यावेत अशी मागणी नगरसेवक निर्मल उर्फ पिंटू कोठारी यांनी प्रांताधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

याबाबत वृत्त असे की, भुसावळ शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढीला लागल्याचे अलीकडे दिसून आले आहे. यामुळे येथील ट्रॉमा केअर सेंटर, ग्रामीण रुग्णालय व डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात कोविड केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी केली आहे.

या संदर्भात निर्मल कोठारी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १५ फेब्रुवारीपासून शहर व तालुक्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी कमी असल्याने तपासणीसाठी रुग्णांना थांबून राहावे लागते. वाढत्या संसर्गामुळे थांबून राहणार्‍या रुग्णांनाही धोका होऊ शकतो. रेल्वे हॉस्पिटलमध्येही कोरोनाचे रुग्ण दाखल करण्याची परवानगी देणे, यापूर्वीच्या कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी. जेणेकरून कोरोनाविरूद्धची लढाई अधिक परिणामकारक करता येईल असे या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहेे.

Protected Content