जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शासकीय आरोग्य योजनांची माहिती सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नर्सिंग विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. ग्रामीण व दुर्गम भागात ‘होम व्हिजिटिंग’च्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांना मोफत उपचार, शस्त्रक्रिया आणि विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती द्यावी, असे आवाहन गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना करण्यात आले.
गोदावरी फाउंडेशन संचालित गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात सोमवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी अक्षता पाटील सभागृहात शासकीय आरोग्य योजनांबाबत विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गोदावरी हॉस्पिटलच्या मेडिसिन विभागातील डॉ. सौरभ मुळे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

डॉ. सौरभ मुळे यांनी गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या विविध शासकीय आरोग्य योजना, मोफत उपचार सुविधा तसेच विविध आजारांवरील मोफत शस्त्रक्रियांबाबत माहिती दिली. सर्वसामान्य नागरिक आणि गरजू रुग्णांना या योजनांचा लाभ कशा प्रकारे घेता येतो, त्यासाठी कोणती प्रक्रिया पूर्ण करावी लागते आणि उपचारांसाठी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, याबाबत त्यांनी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
नर्सिंग अभ्यासक्रमातील ‘कम्युनिटी हेल्थ नर्सिंग’ या विषयांतर्गत विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात ‘होम व्हिजिटिंग’च्या माध्यमातून नागरिकांशी थेट संपर्क साधण्याची संधी मिळते. या संधीचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी ग्रामीण तसेच दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय आरोग्य योजनांची माहिती द्यावी. त्यांच्यामध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करावी आणि गरजू रुग्णांना योग्य योजनांची निवड करून त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करावे, हा कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता.
अनेकदा शासकीय आरोग्य योजनांची माहिती नसल्यामुळे गरजू रुग्ण या योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या कुटुंबांना उपचारांचा खर्च परवडत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी शासकीय योजनांची योग्य माहिती मिळाल्यास रुग्णांना मोफत किंवा उपलब्ध सुविधांनुसार उपचार घेणे शक्य होऊ शकते. त्यामुळे नर्सिंग विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत ‘आरोग्यदूत’ म्हणून काम करावे आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यविषयक माहिती पोहोचवावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विशाखा गणवीर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील शिक्षक आणि संबंधित विभागाने विशेष सहकार्य केले.
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या या उपक्रमातून नर्सिंग विद्यार्थ्यांना शासकीय आरोग्य योजनांची माहिती मिळण्यासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत ती पोहोचविण्याची सामाजिक जबाबदारीही अधोरेखित झाली. ‘होम व्हिजिटिंग’च्या माध्यमातून जनजागृती केल्यास अधिकाधिक गरजू रुग्णांना शासकीय आरोग्य सुविधांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.



