‘फिट इंडिया मुव्हमेंट’च्या ब्रँड अँबेसेडरपदी भुसावळकर युवक !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्र सरकारच्या फिट इंडिया मुव्हमेंटच्या ब्रँड अँबेसेडरपदी भुसावळकर युवक रणजितसिंग राजपूत यांची निवड करण्यात आली आहे.

आजवर विविध राज्य आणि केंद्रस्तरीय पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आलेले रणजितसिंग राजपूत यांना केंद्र शासनाच्या फिट इंडिया मुव्हमेंटच्या सदिच्छा दूतपदी ( ब्रँड अँबेसेडर ) नियुक्त करण्यात आले आहे. त्यांनी सोशल मीडियातून याबाबतची घोषणा केली आहे. २०१९ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राष्ट्रव्यापी चळवळीची घोषणा केली होती. या माध्यमातून निरोगी राष्ट्रनिर्माण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आलेले आहे. रणजितसिंग राजपूत यांना या चळवळीच्या सदिच्छा दूतपदी नियुक्त करण्यात आले असून या मुव्हमेंटच्या कार्यकारी संचालिका एकता विष्णोई यांनी याबाबतचे पत्र त्यांच्या नावाने जारी केले आहे.

रणजितसिंग राजपूत हे नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक असून संस्कृती फाऊंडेशच्या माध्यमातूनही त्यांनी विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले आहेत. यात स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, मतदान जनजागृती आदींचा समावेश आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. तसेच त्यांना याआधी जलसंधारणाच्या कामांसाठी वॉटर हिरो या सन्मानानेही गौरविण्यात आले होते. यानंतर आता त्यांना स्पोर्टस ऑथेरिटी ऑफ इंडियातर्फे राबविण्यात येणार्‍या फिट इंडिया मुव्हमेंटच्या सदिच्छा दूतपदी नियुक्ती मिळाल्याने त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव झाल्याचे मानले जात आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात येत आहे.

Protected Content