भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील टहाकळी येथे सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलीस पथकाने छापा टाकून जुगार्यांवर कारवाई केली आहे.
अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना टहाकळी-चिंचोल मार्गावरील हॉटेल स्वप्नपूर्णाच्या मागील बाजूला जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली. या अनुषंगाने त्यांनी पोलीस पथकाला या अड्डयावर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. यानुसार वरणगाव पोलीसांच्या पथकाने गुरूवारी सायंकाळी येथे छापा टाकला.
या छाप्यात पोलिसांनी १७ जुगारींकडून १ लाख ५६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली. तर, याप्रसंगी प्रवीण दगडू पाटील (रा.वढवे ता.मुक्ताईनगर), संजय श्रीराम चौधरी, विकास नारायण चौधरी, मनोहर देवराम पाटील, अमोल काशीनाथ पाटील (रा.चिंचोल ता.मुक्ताईनगर), राजेश जगदीश पाटील (रा.काहुरखेडे), गौरव अनिल तळेले, वैभव अशोक पाटील (रा.मुक्ताईनगर), शेख अन्वर शेख अकबर, शेख नईम शेख रहेमान, नितीन निवृत्ती माळी, महेंद्र कडू वंजारी (सर्व रा.वरणगाव), संजय विश्वनाथ पाटील, सचिन सोपान इंगळे (रा.हरताळे), गोपाळ रघुनाथ तायडे, देविदास भीमराव सपकाळे (रा.मानपूर), पद्माकर गोपाळ पाटील (रा.सुसरी) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांच्या कारवाईचा सुगावा लागल्यानंतर समाधान बाजीराव पाटील व वसंत भलभले यांनी जुगार अड्डयावरून पोबारा केला आहे. ही कारवाई एपीआय आशिष अडसूळ, उपनिरीक्षक परशुराम दळवी व त्यांच्या सहकार्यांनी केली. या प्रकरणी पोलिस चेतन प्रभाकर निकम यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.