भुसावळ नको, आम्हाला वरणगाव तालुका हवा ! : समोर आली मागणी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ तालुक्याचे विभाजन करून वरणगावला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिळावा अशी मागणी येथील माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी महसूल मंत्र्यांकडे केली आहे.

सध्या भुसावळ तालुक्यात असणारे वरणगाव हे मोठे शहर असून यासह परिसरातील गावांचा समावेश करून स्वतंत्र वरणगाव तालुका तयार करण्यात यावा अशी मागणी कधीपासूनच करण्यात येत आहे. याचाच पाठपुरावा आता माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सुरू केला आहे. या अनुषंगाने त्यांनी काल महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

या संदर्भातील निवेदनात सुनील काळे यांनी म्हटले आहे की, वरणगाव हे शहर ब्रिटिश राजवटीत तालुक्याचे ठिकाण होते. या परिसरात फक्त वरणगाव व बोदवड बाजारपेठ होती. तसेच राज्यात गुरांचा मोठा बाजार आजही मंगळवारी वरणगावात भरतो. मात्र सरकारने वरणगावऐवजी भुसावळ तालुका केला. त्यामुळे महसूलची कामे करण्यासाठी नागरिकांना २० किमी अंतरावर जावे लागते. वरणगाव शहराला लागून २९ गावे आहेत, जवळच दीपनगर वीजनिर्मिती केंद्र, हतनूर धरण आहे. वरणगाव लगत आयुध निर्माणी कारखाना असून, शेजारी बोदवड, मुक्ताईनगर व रावेर हे तालुके आहेत. जर वरणगाव तालुका झाला तर या भागातील लोकांचा भुसावळला जाण्याचा त्रास वाचेल. यामुळे राज्य शासनाने वरणगावला तालुक्याचा दर्जा द्यावा अशी मागणी सुनील काळे यांनी केली आहे.

सुनील काळे यांनी आपल्या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री विखे पाटील व आमदार संजय सावकारे यांची भेट घेतली आहे. या प्रकरणी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Protected Content