बोदवड नगरपंचायतीच्या मतदानास प्रारंभ

बोदवड प्रतिनिधी | येथील नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठी आज सकाळपासून मतदान सुरू झाले असून उद्या याची मतमोजणी होणार आहे.

बोदवड नगरपंचायतीच्या एकूण १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. प्रक्रिये दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून चार जागांची निवडणूक स्थगित झाली होती. तर १३ जागांसाठी यापूर्वी मतदान झालेले असले तरी मतमोजणी राहीली आहे. दरम्यान, ओबीसी राखीव जागांवरील निवडणूक खुल्या प्रवर्गातून घेण्याचे आदेश झाले.

या अनुषंगाने बोदवड मध्ये प्रभाग क्रमांक २, ३, १५ व १७ मधील चार जागांसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान सुरू झाले आहे. त्यासाठी साकला कॉलनीतील मराठी मुलींची शाळा व मनूर रोडवरील उर्दू शाळेत मतदान सुरू झाले आहे.

आज मतदान झाल्यानंतर उद्या म्हणजेच ब सर्व १७ प्रभागांसाठी तहसील कार्यालयात मतमोजणी होईल. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. त्यासाठी सहा राऊंड टेबल असतील. प्रत्येक राऊंडमध्ये प्रभागनिहाय तीन वार्ड व ६ मतदान केंद्रांची मतमोजणी होईल. एका राउंडसाठी सुमारे अर्धा तास याप्रमाणे प्रथम राउंडचा निकाल सकाळी ११ वाजेपर्यंत हाती येईल. अंतिम निकाल दुपारी १ वाजेपर्यंत हाती येतील.

बोदवड नगरपंचायतीमध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांमध्ये जोरदार टक्कर होत आहे. या निवडणुकीचा निकाल दोन्ही मान्यवरांसाठी महत्वाचा असून जनता कुणाला कौल देणार हे उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.

Protected Content