भुसावळच्या तरूणीचा आंतरधर्मीय विवाह; कुटुंबात परतण्यास नकार

भुसावळ प्रतिनिधी । येथील एका तरूणीने सोशल मीडियातून झालेल्या ओळखीतून एका परधर्मीय तरूणाची धर्मांतर करून विवाह केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करतांना ही बाब उघड झाली असून तरूणीने आपण सुखात असल्याचे सांगत कुटुंबियांकडे येण्यास नकार दिला आहे.

भुसावळ शहरातील २५ वर्षीय तरुणीचे १८ जून २०२० रोजी एका कारमध्ये नेत कोणीतरी अपहरण केले होते. याबाबत तक्रार दाखल झाली होती. या तरूणीचा शोध पोलीसांनी लावला आहे. तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून कुर्ला येथील तरुणाशी ओळख झाली होती. तेंव्हापासून दोघे संपर्कात होते. यानंतर तरुण १८ जून रोजी भुसावळात येऊन तरुणीस घेऊन गेला होता. त्या दोघांनी कुर्ला येथे रितसर विवाह केला. तर तरुणी बेपत्ता झाल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी भुसावळ बाजारपेठेत अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या तरुणीच्या कुटुंबियांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले, सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश गोटला, अनिल मोरे, रवींद्र गिरासे, विजय पाटील, नरेंद्र वारुळे यांच्या पथकाने कुर्ला येथून तरुणीस ताब्यात घेतले. चौकशी केली असता ती स्वत:च्या इच्छेने मुंबईत आल्याचे तिने सांगीतले. तसेच तरुणाशी प्रेमविवाह केला असून आपण संसारात सुखी आहोत, घरी परत जायचे नाही. असा जबाब तिने पोलिसांना दिला आहे. या तरुणीची कौटुंबीक परिस्थिती हालाखीची होती. त्यामुळे तिने प्रेमविवाह करून मुंबईत राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Protected Content