भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील अतिशय महत्वाच्या असणार्या साकेगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत भाजपने बहुमत संपादन केले आहे. यामुळे भाजपने येथे सत्ता कायम राखली आहे.
साकेगाव येथे भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात अतिशय चुरशीची लढत झाली. भाजपतर्फे माजी सरपंच अनिल पाटील व माजी संरपंच आनंदा ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल उभे होते. तर जि.प. सदस्य रवींद्र नाना पाटील व माजी उपसरपंच शकील पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे पॅनल उभे होते.
आज झालेल्या मतमोजणीत भाजपप्रणीत पॅनलला दहा जागा मिळाल्या असून राष्ट्रवादी प्रणीत पॅनलला सात जागांवर समाधान मानावे लागले आहे. यामुळे येथे भाजपने सत्ता कायम राखण्यात यश मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र भाजपला यश मिळाले असतांना माजी सरपंच अनिल पाटील यांचा मात्र धक्कादायक पराभव झाला आहे. यामुळे भाजपची स्थिती गड आला पण सिंह गेला अशी झाली आहे.