कुणीही विजयी झाले तरी भारत – अमेरिका मैत्री सुधारण्याची आशा

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था । संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेल्या अमेरिका निवडणुकीत विजय कुणाचाही झाला तरी भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध सध्या आहेत तसेच राहतील आणि त्यापेक्षाही पुढच्या स्तरावर जातील, असं दिसून येतं.

अमेरिकेतील दोन्ही पक्षांच्या प्रचारातील मुद्द्यांवरुन हा अंदाज लावता येतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात भारताचा सर्वात चांगला मित्र म्हणून ओळख मिळवली आणि दोन्ही देशांचे संबंध नव्या उंचीवर नेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेत एकत्रितपणे सभांनाही संबोधित केलं होतं.

डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचारातही भारताचा मुद्दा पुढे केला होता. आपल्याला भारताकडून मोठा पाठिंबा असल्याचं ते म्हणाले होते. पंतप्रधान मोदी हे माझे मित्र असून ते चांगलं काम करत आहेत. काहीच सोपं नसतं, पण ते चांगलं करत आहेत, असं ट्रम्प गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या अमेरिकेतील हाऊडी मोदी कार्यक्रमात म्हणाले होते.

माजी उपाध्यक्ष आणि डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन हे अमेरिका-भारत संबंधांचे खंदे समर्थक आहेत. डेलावेअरमधून तीन दशके सिनेटर म्हणून आणि त्यानंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात उप राष्ट्राध्यक्ष म्हणून बिडेन यांनी आठ वर्ष काम केलं आहे. भारत अमेरिका सिव्हिल न्युक्लिअर डील आणि ५०० बिलियन अमेरिकन डॉलरच्या द्विपक्षीय व्यापाराचं ध्येय ठेवणे या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावत बिडेन यांनी भारतीय नेतृत्त्वासोबत चांगले संबंध जोपासले आहेत. याशिवाय बिडेन यांचे भारतीय अमेरिकन्ससोबतही जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

अमेरिका आणि भारत नैसर्गिक मित्र आहेत, असं बिडेन जुलैमध्ये झालेल्या एका सभेत म्हणाले होते. भागीदारी, धोरणात्मक भागीदारी ही सुरक्षेसाठी अत्यावश्यक आणि महत्त्वाची आहे, असं ते म्हणाले होते. उप राष्ट्राध्यक्ष म्हणून आपल्या ८ वर्षांच्या कार्यकाळाचा दाखला देत ते म्हणाले, ‘भारत-अमेरिका सिव्हिल-न्युक्लिअर डीलला काँग्रेसची परवानगी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावल्याचं सांगता अभिमान वाटतो.’

संबंध आणखी मजबूत करणे आणि धोरणात्मक भागीदारीला अत्यंत महत्त्व देणे ही ओबामा-बिडेन कार्यकाळात प्राथमिकता होती आणि मी निवडून आल्यानंतरही हीच प्राथमिकता असेल, असं बिडेन यांनी सांगितलं होतं.

दिल्लीत २+२ स्तरीय चर्चा झाली, ज्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर देण्यात आला. त्यामुळे अमेरिका निवडणुकीच्या निकालानंतरचे भारत-अमेरिका संबंध तेव्हाच स्पष्ट झाले होते. पुढच्या काळातही दोन्ही देशांची भागीदारी अत्यंत महत्त्वाची राहणार असल्याचं तेव्हाच स्पष्ट झालं होतं.

कुणीही सत्तेत असलं तरी भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार वेगाने वाढतच राहणार असल्याचं चित्र आहे. यावर्षी झालेल्या व्यापारविषयी चर्चेतील बाबींची अंमलबजावणी सुरू होण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे भारत अमेरिकेकडून शस्त्रखरेदी कायम ठेवण्याची शक्यता असून ऊर्जा क्षेत्रातही दोन्ही देश आपले संबंध एका नव्या उंचीवर नेतील.

बिडेन प्रशासनाच्या काळात पुन्हा एकदा हवामान बदल मुद्द्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिका समन्वय अधिक मजबूत होईल. H1B व्हिसा मुद्द्यावर बिडेन किंवा ट्रम्प यांनी अजूनही ठोस आश्वासन दिलेलं नाही. त्यामुळे हा प्रश्न तसाच रेंगाळता राहण्याची शक्यता आहे.

वाढत्या हुकूमशाहीवादावर आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या वर्षात सर्व लोकशाही राष्ट्रांची परिषद बोलावणार असल्याचं बिडेन यांनी जाहीर केलं आहे. अर्थातच यात भारताची भूमिका महत्त्वाची असेल. या परिषदेत निवडणूक सुरक्षितता आणि मानवाधिकारावर मंथन होईल. चीनच्या आक्रमकपणाला उत्तर देण्यासाठीही भारत अमेरिकेसाठी महत्त्वाचा आहे.

दरम्यान, निकाल कुणाच्याही बाजूने लागला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात अगोदर शुभेच्छा देणाऱ्या काही जागतिक नेत्यांपैकी एक असणं अपेक्षित आहे.
==========================================

Protected Content