भुसावळ प्रतिनिधी | शहरातील खरात टोळीला हद्दपार करून त्यांना हव्या असणार्या ठिकाणी पोलिसांनी पोहचवले असून आता शहरातील गुन्हेगारांच्या इतर गँग रडारवर आहेत. येत्या काही दिवसांमध्ये त्यांच्यावरही याच प्रकारची कारवाई होऊ शकते अशी माहिती डीवायएसपी वाघचौरे यांनी दिली आहे.
दोन दिवसांपूर्वीच पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी खरात गँगमधील पाच जणांच्या हद्दपारीचे आदेश काढले आहेत. पोलिस प्रशासनाने आतिष रवींद्र खरात, नगरसेवक असलेला राजकुमार खरात, हंसराज खरात, राजन उर्फ गोलू खरात आणि अमोल उर्फ चिन्ना खिल्लारे यांच्या विरूद्ध हद्दपारीचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठवला होता. त्यानुसार झालेल्या चौकशीअंती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मुंडे यांनी ११ ऑगस्टला चारही खरात भावंडे आणि चिन्नाच्या हद्दपारीचे आदेश काढले.
यानंतर कागदोपत्री पूर्तता करून त्यांना इच्छीत स्थळी रवाना करण्यात आले. खरात बंधूपैकी एक भाऊ मुंबई, दुसरा औरंगाबाद आणि चिन्नासह दोन भाऊ अकोला येथे हद्दपारीच्या काळात वास्तव्यासाठी गेले आहेत. हद्दपारीच्या कालावधीत ते तेथेच राहणार आहेत. पोलिसांच्या पथकाने त्यांना तेथे सोडले. दरम्यान, शहरातील अन्य टोळ्यांच्या गुन्ह्यांची माहिती संकलीत करण्यात आली असून त्यांच्यावरही लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.