वृध्दाला फसवून लॉकरमधील दागिने परस्पर काढले; मुलगी व नातवाविरूध्द गुन्हा

जळगाव प्रतिनिधी | शहरातील मोहननगरातील रहिवासी असणार्‍या वृध्दाला त्यांची मुलगी आणि नातवाने फसवून त्यांच्या लॉकरमधील तब्बल ४३ लाख ७६ हजार रूपयांचे दागिने परस्पर काढल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, यादवराव सुपडू बाबरेकर हे मोहननगरातील रहिवासी आहेत. त्यांनी एका बँकेतील लॉकरमध्ये ९६ तोळे सोने आणि ८० तोळे चांदीचे दागिने ठेवले होते. अलीकडेच २ ऑगस्ट रोजी त्यांनी बँकेत जाऊन लॉकरमधील दागिन्यांबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी बँक व्यवस्थापकाने त्यांना त्यांची मुलगी वैशाली वाणी यांना या लॉकरबाबत विचारणा करण्याची सूचना केली. यामुळे बाबरेकर यांनी आपल्या मुलीशी संपर्क साधला असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे त्यांना या प्रकरणी संशय आला. त्यानंतर त्यांनी वैशाली वाणी हिच्यासह औरंगाबाद येथील मुलगी उज्ज्वला व पुणे येथील लहान मुलीशी मोबाइलव्दारे संपर्क साधून जळगाव येथे बोलावले. त्यांनी या प्रकाराबाबत माहिती दिली. मोठी मुलगी ज्योती काथार (रा. नवी मुंबई) हिलाही बोलावले. सर्व कुटुंबीय एकत्र आल्यावर वैशालीला लॉकरमधील दागिन्यांबाबत विचारणा केली. लॉकरमधील दागिने घेतलेले आहेत. मात्र, ते तुम्हाला देणार नाही, असे वैशालीने सांगितले. लॉकरमधील दागिने घेतले असल्याचीही तिने कबुली दिली.

दरम्यान, बँकेतील लॉकरमधून दागिने हे आपली मुलगी वैशाली वाणी हिने नातू हरीश वाणी यांनी काढल्याचे त्यांना दिसून आले. यामुळे यादवराव बाबरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुलगी वैशाली वाणी व नातू हरिष वाणी यांच्याविरुध्द रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content