रात्रीच्या काळोखाला छेदत भुसावळचे डॉ. तुषार पाटील धावले ७४ किलोमीटर

भुसावळ संतोष शेलोडे । रन स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी पुर्वचाचणी स्पर्धेत भुसावळचे डॉ. तुषार पाटील यांनी रात्रीच्या काळोखात अवघ्या अकरा तासात ७४ किलोमीटर धावून यशस्वी सहभाग नोंदविला आहे. भुसावळ शहर व भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी डॉ. तुषार पाटील यांचे अभिनंदन केले आहे. 

लद्दाख येथे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात दरवर्षी ‘ला अल्ट्रा मॅरेथॉन’ आयोजित केली जाते. त्यासाठी 55 किलोमीटर, 111 किलोमीटर ,222 किलोमीटर, 333 किलोमीटर, 444 किलोमीटर व 555 किलोमीटर अशा वेगवेगळ्या गटात देश-विदेशातील सर्वोत्तम धावपटू सहभाग नोंदवत असतात.  परंतु सदरच्या स्पर्धेसाठी सहभागी होण्यासाठी ठिकठिकाणी प्रिक्वालिफाईड रन आयोजित केले जातात. अशा प्रकारचा रन पुणे येथील गोठावडे फाटा ते लवासा सिटी व तेथून पुन्हा त्याच मार्गे परत असा तब्बल 74 किलोमीटरचा रन आयोजित केला होता. विशेष म्हणजे 1138 मीटर उंचीचे शिखर गाठायचे होते.

शनिवारी रात्री ठीक दहा वाजता भुसावळचे डॉ. तुषार पाटील, मुंबईचे सतीश गुजरण  व तरुण शर्मा, पुण्याचे मंगेश शिंदे ,विशाल, हरी या सहा  धावपटूनी धावायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत सतत अकरा तास धावून 74 किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्याचे ध्येय होते. त्यामध्ये डॉ. तुषार पाटील व सतीश गुजरण यशस्वी झाले.  सदरचा रन लद्दाख अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये 555 किलोमीटर मध्ये यशस्वी सहभाग नोंदविलेले एकमेव भारतीय धावपटू आशिष कासदेकर यांनी आयोजित केला होता. तसेच दक्षिण आफ्रिकेतील 89 किलोमीटरची कॉम्रेड रन सतत दहा वर्षे पूर्ण करणारे मुंबई येथील प्रसिद्ध कोच सतीश गुजरण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. सतीश गुजराल यांनी पेसरच्या  भूमिकेतून प्रत्येक धावपटूचा प्रदीर्घ अशा रनमध्ये उत्साहित ठेवले.

भुसावळ येथील डॉ. पाटील यांनी सदरचे 74 किलोमीटरचे अंतर व 1138 मीटर ची उंची 10 तास 49 मिनिटात पूर्ण केले. रात्रीच्या काळोखात व सोबत असलेल्या सपोर्टिंग वॅनच्या प्रकाशात धावणे एक आव्हान आहे सपोर्टिंग वॅनमध्ये उपलब्ध असलेले पाणी, एनर्जी ड्रिंक, फळे इत्यादींमुळे धावण्याची क्षमता टिकून राहिली व सोबत सतीश गुजरण सरांचे मार्गदर्शन यामुळे हा रन सहज पूर्ण करू शकलो असे डॉ. तुषार पाटील म्हणाले. भुसावळ शहरात डॉ. तुषार यांच्यासारखे उत्कृष्ट धावपटू आहेत याचा आनंद आहे. त्यांची इच्छाशक्ती दांडगी आहे व कौतुकास्पद आहे असे सतीश गुजरण म्हणाले. डॉ. तुषार यांचे प्रवीण फालक, डॉ. निलिमा नेहेते, गणसिंग पाटील, प्रवीण पाटील, संतोष गवळे, विकास पाटील व भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.

Protected Content