कंत्राटी बीएएमएस पदवीधर वार्‍यावर : मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी- डॉ. नि. तु. पाटील

भुसावळ प्रतिनिधी । कोविडच्या आपत्तीत अतिशय निर्भयपणे कर्तव्य बजावणार्‍या बीएएमएस पदवीधरांचा अचानक काढून टाकण्याचे निर्देश आल्यामुळे या पदवीधरांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन त्यांना पुन्हा सेवेवर घ्यावे अशी मागणी भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी केली आहे.

राज्य शासनाच्या एका निर्णयानुसार राज्यातील कोविडच्या प्रतिकारासाठी कार्यरत असणार्‍या बीएएमएस पदवीधरांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. एका अर्थाने गरज सरो, वैद्य मरो या उक्तीप्रमाणे या डॉक्टर्सला वार्‍यावर सोडण्यात आले आहे. याची दखल घेऊन भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एक पत्र लिहून या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांचे हे पत्र आपल्यासाठी जसेच्या तसे सादर करत आहोत.

मा.श्री.उद्धवजी ठाकरे,
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य

साहेब,
सस्नेह जय श्रीराम…!

मा. महोदय,
मी डॉ.नितु पाटील,राहणार भुसावळ जि. जळगाव तथा उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक ,वैद्यकीय आघाडी, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्य आपले खालील मुद्द्यावर लक्ष वेधू इच्छितो…!

संपूर्ण महाराष्ट्रात करोना विषाणूचा प्रादुर्भाव, प्रभाव, प्रकार,प्रकोप आणि प्रसार जोरात होत असून कुठे तरी पहिली लाट ओसरत आहे,आता लढा हा दुसऱ्या लाटेसोबत चालू आहे आणि तयारी ही तिसऱ्या आणि चौथ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी सुरू आहे.

मा.महोदय,
करोना प्रादुर्भाव वाढत असतांना ग्रामीण भागात,खेडोपाडी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्याठिकाणी रुग्ण सेवा करणारे कंत्राटी डॉक्टर मंडळी यांचाच आधार होता. ही सर्व मंडळी आपल्या जीवाची आणि परिवाराची कुठलीही पर्वा न करता करोना बाधित रुग्ण तपासणे,स्वाब जमा करणे, गावात जनजागृती करणे, शक्य असेल त्यांचे उपचार करणे,काहींना मोठ्या सेन्टर मध्ये पाठवणे,आदी आदी कार्य त्यांनी इमानेइतबारे केले.ही सर्व कंत्राटी डॉ. मंडळी BAMS पदवी धारक आहे. त्यांच्या जीवावर आपण खेड्यापाड्यात पहिली करोना संक्रमण लाट रोखू शकलो. हे सर्व करत असतांना अचानक आरोग्य सेवा आयुक्तांलय मार्फत लेखी दि.06/05/2021 चा आदेश येतो,

“राज्यातील शासकीय/महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालयामधून MBBS पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व दि.31 मार्च 2021 अंतरवासीता प्रशिक्षण पूर्ण उमेदवारांना बांधपत्रित शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ,वैद्यकीय अधिकारी गट-अ च्या पदावर जेथे कंत्राटी BAMS वैद्यकीय अधिकारी कार्यरत असतील त्यांना कार्यमुक्त करणे अनिवार्य आहे.तथापि कोविड 19 साठी राष्ट्रीय अभिमान अंतर्गत मंजूर पदांसाठी आवश्यकत्यानुसार सेवा घेण्याचा विचार करण्यात यावा.”

मा. महोदय,
राज्यात BAMS पदवी धारक यांना जुन 2019 मध्ये शासनाने स्थायी पद देउन सेवेत समाविष्ट करण्यात आले,त्यामूळे राज्यात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त झाली,त्यावेळेस MBBS पदवी धारक मिळत नसल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली तेव्हा गट – अ पदावर BAMS पदवी धारक यांची कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. यानंतर मार्च 2020 मध्ये यासर्वांनी करोना प्रतिबंध कार्यात झोकून दिले.

आता,बांधपत्रित MBBS डॉक्टर यांना ग्रामीण भागात 1वर्ष सेवा देणे ,बंधनकारक असल्याने राज्यातील जवळपास 800 च्या वर कंत्राटी BAMS डॉक्टरांच्या पोटावर लाथ बसत आहे.करोना सेवा म्ह्णून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सेवा घेण्याबाबत सांगितले आहे ,पण किती डॉक्टर मंडळी यांना सेवेत घेणार,पुढे करोना आटोक्यात आल्या नंतर काय ?

जेव्हा शासनाला आरोग्य सेवा देण्यासाठी कोणी तयार नव्हते तेव्हा BAMS पदवी धारक “स्वतः हा” पुढे आले आणि आता मात्र MBBS डॉक्टर मंडळी यांना “बंधनकारक” असल्याने लगेच शासनाने कार्यरत डॉक्टरांना घरचा रस्ता दाखवला.यामुळे डॉ. आणि त्यांचे परिवार यांची घोर निराशा सरकारने केली असून “गरज सरो अन् वैद्य मरो” ही म्हण सरकार खरी करतांना दिसत आहे.

माझी आपल्याकडे नम्र विनंती आहे की,हे सर्व डॉक्टर मंडळी आपलीच आहे,मराठी आहे,ह्याच महाराष्ट्रात वाढलेली आहे,तेव्हा आपल्याच मराठी माणसावर असा अन्याय होणे, ते पण आपल्याकडुन काही संयुक्तिक नाही.तेव्हा यांनी करोना काळात केलेल्या सेवेचा सन्मान करत या सर्वांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात यावे.

जय महाराष्ट्र..! जय श्री राम..!

आपला मराठी माणूस,

डॉ. नितु पाटील,
उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक ,
वैद्यकीय आघाडी,भारतीय जनता पार्टी ,
महाराष्ट्र राज्य,

Protected Content