भुसावळजवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने तरूणाचा मृत्यू

Crime

जळगाव प्रतिनिधी । मित्रांसोबत रोजगाराच्या शोधात महाराष्ट्र एक्स्प्रेसने पुणे येथे जात असलेल्या उत्तम बिसन सोनवणे (वय 35, रा.धानखेड, ता.बोदवड) या तरुणाचा भुसावळ रेल्वे स्थानकानजीक रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी सकाळी 7.30 वाजेपूर्वी घडली.

धानखेड येथे उत्तम बिसन सोनवणे हा रोजगार नसल्याने हातमजुरी करुन उदनिर्वाह सुरु होता. चुलत भाऊ गजानन सोनवणे, संजय सोनवणे, ज्ञानेश्‍वर पाटील, अरुण धोबी यांचे रोजगाराच्या शोधात पुणे येथे जात होते. त्याच्यासोबत उत्तम सोनवणेही जाण्याचे ठरले. नियोजनानुसार सर्व जण सोमवारी रात्री मलकापूर येथून महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये पुणे येथे जाण्यासाठी बसले. जनरल बोगीत मित्र बसले. गाडीत गर्दी असल्याने उत्तम हा रेल्वेच्या फाटकात उभा होता. गाडीने भुसावळ पोहचणार तोच गर्दीमुळे उत्तमचा तोल गेला अन् तो रेल्वेतून खाली पडला. मित्रांच्या समोरच हा प्रकार घडल्याने भुसावळ स्थानक येताच सोबतच्या चुलतभाऊ तसेच मित्रांनी गाडीतून उतरुन घटनास्थळ गाठले. मात्र उत्तम सापडला नाही. मंगळवारी सकाळी भुसावळ स्टेशन मास्तर बी.के.तनकू यांनी लोहमार्ग पोलिसांना प्रकार कळविला. भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल शाम बोरसे, पोलीस नाईक राजू अढाळे यांनी घटनास्थळ गाठले. यादरम्यान उत्तमच्या शोधात असलेले मित्र पोलीस ठाण्यात चौकशीसाठी पोहचले होते. त्यांनी मृतदेह उत्तमचा असल्याची ओळख पटविल्यावर मित्रांना सोबत घेत लोहमार्ग पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला शवविच्छेदनानंतर मृतदेह उत्तमच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Protected Content