सर्वोदय छात्रालयाच्या ताब्याची कागदपत्रे सादर करा : मुख्याधिकार्‍यांनी बजावली नोटीस

भुसावळ प्रतिनिधी । माजी आमदार संतोष चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने चर्चेत आलेल्या सर्वोदय छात्रालयाची जागा ही डॉ. वंदना उमेंद्र वाघचौरे यांना नेमकी कशी मिळाली ? त्यांच्याकडे या मिळकतीच्या मालकीचे काही पुरावे आहेत का ? अशी विचारणा करणारी नोटीस मुख्याधिकार्‍यांनी बजावली असून याचे सात दिवसात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

याबाबत वृत्त असे की, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या सर्वोदय छात्रालयाच्या जागेच्या मालकीचा वादा आता मोठ्या प्रमाणात चिघळल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी या जागेतील बांधकामाबाबत नगरपालिका अधिकारी गेले असता माजी आमदार संतोष चौधरी यांनी त्यांना शिवीगाळ करून धमकावले होते. या प्रकरणी संतोष चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या जामीनावर दिनांक १ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, सर्वोदय छात्रालयाची जागा ही सौ. रेखा संतोष चौधरी या नगराध्यक्षा असतांना डॉ. वंदना उमेंद्र वाघचौरे यांना देण्यात आल्याचा दावा मध्यंतरी करण्यात आला होता. या अनुषंगाने त्यांनी बाजारपेठ पोलीस स्थानकात २५ फेब्रुवारी २०२० रोजी पत्र देखील दिले होते. तर, हा दावा खोटा असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा सर्वोदय छात्रालयाचे अध्यक्ष प्रमोद सावकारे यांनी सांगून सर्वोदय छात्रालयास कुलूप ठोकले आहे. या पार्श्‍वभूमिवर, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी डॉ. वंदना वाघचौरे यांना नोटीस बजावली आहे.

या नोटीसमध्ये म्हटले आहे की, सर्वोदय छात्रालय या जागेच्या अभिलेख्यावर ४/३४७ अन्वये अध्यक्ष, सर्वोदय छात्रालय अशी नावाची नोंद करण्यात आलेली आहे. तर वंदना उमेश वाघचौरे यांच्या नावाची नोंद ४/३४७/१ अन्वये नोंद केलेली आहे. आपल्याला ही जागा कोणत्या कागदपत्रांच्या आधारे देण्यात आली ? याबाबतच्या नोंदी, सात-बारा उतारे व जागा देण्याबाबतचा ठरावाच्या प्रती ही कागदपत्रे आपण नगरपालिका प्रशासनाकडे सात दिवसांच्या आत सादर करावीत असे या नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे. ही कागदपत्रे सादर न केल्यास आपल्याविरूध्द महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५चे कलम-१८९; महाराष्ट्र प्रादेशीक नगररचना अधिनियम १९६६चे कलम ५२, ५३ आणि ५४ अन्वये कार्यवाही करण्यात येईल असा इशारा मुख्याधिकार्‍यांनी या नोटीसमध्ये दिलेला आहे.

Protected Content