भुसावळ प्रतिनिधी | भोरगाव लेवा पंचायतीच्या वतीने शहरात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
लेवा पाटीदार समाजाची मातृसंस्था मानल्या जाणार्या भोरगाव लेवा पंचायतीच्या वतीने भुसावळात समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. लग्नकार्यात खर्च होणारा अफाट पैसा, नाचगाणे, जेवणावळीत होणारी नासाडी याला आळा घालण्यासाठी डॉ.बाळू पाटील यांच्या पुढाकाराने भुसावळात सामूहिक विवाह सोहळ्यांचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यातील यंदाचा सोहळा भुसावळ शहरातील संतोषी माता हॉलमध्ये आयोजीत करण्यात आला आहे. त्यासाठी १५ जोडप्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी एक जोडपे इतर समाजातील आहे. अजून काही जोडपी नोंदणी करण्याची शक्यता आहे. या सर्व जोडप्यांना पंचायतीतर्फे कपडे, आंदण, गॅस शेगडी, दोन सिलिंडर, मिक्सर अशा भेटवस्तू दिल्या जाणार आहेत.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने कोरोनाची नवीन नियमावली जाहीर केली असून याचे तंतोतंत पालन करून सामूहिक विवाह सोहळा पार पडणार असल्याची माहिती रविवारी झालेल्या आयोजन समितीच्या बैठकीत देण्यात आली. या सामूहिक विवाह सोहळ्यात वधूकडील १५ व वराकडील १५ अशा एकूण ३० वर्हाडींना सहभागाची परवानगी आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळूनच फिजिकल डिस्टन्सिंग ठेवत विवाह सोहळा पार पडणार आहे. यावेळी जेवण, वाजंत्री, ब्युटिशीयन, भटजी याचा सर्व खर्च भोरगाव लेवा पंचायतीकडून केला जाणार आहे.
या उपक्रम समितीच्या अध्यक्षा आरती चौधरी म्हणाल्या की, हा सोहळा झाल्यानंतर पुन्हा तीन-चार महिन्यात नवीन सामूहिक सोहळा घेण्याचे नियोजन सुरू आहे. यंदाचा सोहळा हा कोरोनाच्या नियमांचे पालन करून आयोजीत करण्यात येत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.