भुसावळ, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गुन्हेगारी कृत्य करण्याच्या तयारीत असणार्या तिघांकडून गावठी कट्टा जप्त करत त्यांना गजाआड करण्यात आले आहे. ही कारवाई बाजारपेठ पोलिसांनी केली.
या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, वांजोळा रोड भागात बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने कारवाई करून तिघांना अटक केली. काही संशयित पिस्तूल बाळगून गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने सापळा रचून केलेल्या कारवाईत तुषार किशोर खरारे व कमलेश किशोर खरारे (दोन्ही रा.विघ्नहर्ता नगर, जामनेर रोड, भुसावळ) हे दोन्ही भाऊ व विजय संजय निकम (रा.चोरवड, ता.भुसावळ) यांना अटक करण्यात आली. या तिघांची झडती घेतली असता, त्यांच्याकडून १५ हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल, ३० हजारांची दुचाकी (एमएच.१९-डीसी.८८६०) जप्त करण्यात आली. पोलिस नाईक नीलेश चौधरी यांच्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
ही कारवाई डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मंगेश गोंटला, गणेश धुमाळ, हरीष भोये, उपनिरीक्षक महेश घायतड, रमण सुरळकर, नीलेश चौधरी, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, योगेश माळी, प्रशांत सोनार आदींनी केली. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला करत आहेत.