भविष्यात अमळनेर जिल्हा होणार – आ. अनिल पाटील

अमळनेर प्रतिनिधी । शहराचा वाढता विस्तार व महत्त्व लक्षात घेऊन पाचपावली देवीजवळील जुन्या पोलीस लाइनची जागा नवीन महसूल कार्यालयासाठी निवडण्यात आली आहे. भविष्यात अमळनेर जिल्हा होणार, याठिकाणी कलेक्टर ऑफिस देखील येऊ शकेल, असे भाकीत आमदार अनिल पाटील यांनी अमळनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान नुतनीकरणाच्या भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केले.

अमळनेर येथील नगरपरिषद मालकीच्या न्यू प्लॉट परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आधुनिकीकरणास आमदारांनी 50 लक्ष निधी दिल्याने याचा भुमिपूजन सोहळा  रविवार दि 30 रोजी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला.यावेळी अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष विनोदभैय्या पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आ.डॉ बी एस पाटील, जि. प. सदस्या जयश्री अनिल पाटील, डॉ अनिल शिंदे, न प चे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, खा शी मंडळाचे कार्याध्यक्ष जितेंद्र जैन, कार्योपाध्यक्ष कल्याण पाटील,प्रा अशोक पवार, प्रकाशचंद पारेख, मकसूद बोहरी, प्रा सुभाषचंद्र सोमाणी, कॉन्ट्रॅक्टर गणेश ठाकरे, संजय शिरोडे, मुन्ना शर्मा, निशांत अग्रवाल आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सदर सोहळ्याचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज गार्डन मॉर्निंग ग्रुप,न्यू प्लॉट परिसर विकास मंच आणि संजय शिरोडे मित्र परिवाराने केले होते.सुरवातीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे माल्यार्पण आणि राष्ट्पिता महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली,यावेळी शहरासह न्यू प्लॉट परिसरातील महिला भगिनी व पुरुष बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुढे बोलताना आ.अनिल पाटील म्हणाले की छत्रपती शिवाजी उद्यान शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे एकमेव उद्यान असल्याने योग्य ठिकाणी आपण निधी दिल्याचे समाधान आहे,याठिकाणी अजून 30 ते 50 लाखांचा निधी देण्याची इच्छा असून फक्त काम करताना केवळ बांधकाम करून शोभा न बिघडवता उद्यानांची उंची वाढवून आधुनिक पद्धतीने सुशोभित करा,जास्तीत झाडे कशी लागतील याचीही काळजी घ्या,शिरपूर पेक्षाही चांगले उद्यान हे झाले पाहिजे आणि तेथील लोक येथील उद्यान पाहण्यासाठी आले पाहिजेत अशी अपेक्षा आमदारांनी व्यक्त केली,तसेच क्रीडा संकुलसाठी साडेआठ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळत असून सोबत 2 ते अडीच कोटीं निधीतून स्विमिंग पूल निर्माण करण्याचे संकेत दिलेत आणि शेवटी शहर रचनेचे नवीन व्हिजन उपस्थितांसमोर मांडून अमळनेर शहर जयपूर सारखे व्हावे अशी इच्छा व्यक्त केली.

डॉ बि.एस पाटील यांनी वृक्षप्रेम, शरीर प्रेम,व्यायाम आणि आरोग्याची काळजी याबाबत अनमोल मार्गदर्शन करत दररोज 30 ते40 मिनिटे पायी चाला, मात्र फक्त चालण्याने वजन कमी होत नाही,गप्पा मारत चालण्यात अर्थ नाही,रात्रीचे जेवण भिकार्यासारखे करा,या उद्यानाचा जास्तीतजास्त फायदा घ्या असे मौलिक सल्ले देत या उद्यानासाठी लोकसहभागातून देखील हातभार लावा असे आवाहन केले,डॉ अनिल शिंदे,जि प सदस्या जयश्री पाटील व प्रा अशोक पवार यांनीही आमदारांनी या उद्यानाचे नूतनीकरण मनावर घेतल्याने कौतुक करत न्यू प्लॉट सारख्या चांगल्या वस्तीत असणारे हे उद्यान वरदान ठरेल अशी भावना व्यक्त केली.तर विनोदभैय्या पाटील यांनी गार्डन ग्रुपच्या उपक्रमांचे कौतुक करत येत्या गुढीपाडव्याला या ग्रुप सोबत पाडवा पहाट कार्यक्रम घेण्याची घोषणा केली.

न्यू प्लॉट परिसर विकास मंचची घोषणा

संपुर्ण न्यू प्लॉट भागातील जेष्ठ व तरुण मंडळींनी एकत्र येऊन न्यू प्लॉट परिसर विकास मंचची स्थापना केल्याने आ.अनिल पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या मंचच्या फलकाचे अनावरण आणि घोषणा यावेळी करण्यात आली. डॉ संजय शाह यांनी मंचची कार्यकारिणी घोषित केली.

यावेळी गार्डन ग्रुप सदस्य तथा काश्मीर येथे कार्यरत सीआरपीएफ जवान योगेश रमेश पवार तसेच न्यू प्लॉट भागात जास्तीत जास्त कोविड लसीकरण होण्यासाठी प्रचंड परिश्रम घेणारे,आबालवृद्धांना स्वतः केंद्रापर्यंत पोहोचविणारे महेश देवसिंग राजपूत आणि कोरोना योध्ये ईश्वर बडगुजर यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी डॉ अनिल शिंदे 21000/-, रुग्णसेवा हॉस्पिटल च्या वतीने डॉ संजीव चव्हाण आणि डॉ. अंजली चव्हाण यांनी 11000/-,डॉ बी एस पाटील,11000/-, विनोदभैय्या पाटील 11000, जितेंद्र जैन 11000/-याप्रमाणे मदत जाहीर करण्यात आली.

या सोहळ्यासाठी न्यू प्लॉट मित्र मंडळ, श्री राजेशहाजी मित्र मंडळ, महाराणा प्रताप मित्र मंडळ, अमळनेर जैन जागृती सेंटर, श्रीराम मित्र मंडळ, श्री शिवाजी गार्डन रिक्षा स्टॉप, चिकाटे गल्ली मित्र मंडळ, दाऊदी बोहरा समाज मंडळ, शिवनेरी मित्र मंडळ, जय झुलेलाल मित्र मंडळ. श्री अंबेमाता नवरात्रोत्सव मंडळ,  प्रबुद्ध हाऊसिंग मित्र मंडळ,टिळक मित्र मंडळ आदींचे अनमोल सहकार्य लाभले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन मॉर्निंग ग्रुप,न्यू प्लॉट परिसर विकास मंचच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन संजय चौधरी तर आभार चेतन राजपूत यांनी मानले.कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून सदर कार्यक्रम पार पडला.

यावेळी खान्देश शिक्षण मंडळ,अर्बन बँक आणि विविध राजकीय व सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, व्यापारी बांधव,महिला व युवा वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.

 

 

 

 

 

Protected Content