भुसावळ प्रतिनिधी | येथील रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या ट्रेनच्या एका डब्याची चाके नादुरूस्त असल्याचे कर्मचार्यांच्या लक्षात आल्याने मोठा अपघात टळला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबईवरून फैजाबाद येथे जाणार्या ०१०६७ डाऊन या एक्सप्रेसचे आज दुपारी साडेबाराच्या सुमारास भुसावळ येथील प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर आगमन झाले. कोणतीही गाडी स्थानकावर आली असता रेल्वे कर्मचारी चाकांसह अन्य भाग सुरक्षित आहेत की, नाहीत ? याची तपासणी करत असतात. या अनुषंगाने कर्मचार्यांनी तपासणी केली असता त्यांना एका कोचची चाके ही नादुरूस्त असल्याचे आढळून आले. त्यांनी ही माहिती तातडीने आपल्या वरिष्ठ अधिकार्यांना कळविली.
यानंतर सुमारे चार तासापर्यंत साकेत एक्सप्रेसला फलाटावरच उभे करून सदोष चाके असलेला डबा बदलण्यात आला. यानंतर ट्रेन पुढील मार्गाला लागली. अर्थात, रेल्वे कर्मचार्यांच्या सतर्कतेमुळे आज मोठा अपघात टळला.