भुसावळात एकाची ३४ हजाराची ऑनलाईन फसवणूक

 

भुसावळ प्रतिनिधी । सीम कार्डचे केवायसी जमा करण्याचे बहाण करून एका ५५ वर्षीय व्यक्तीला अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर नियंत्रण मिळवत बँकेतून ऑनलाईन ३४ हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, हरनाम परचामल बठेजा वय ५५ रा. सिंधी कॉलनी भुसावळ हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २० डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता त्यांना मोबाईलवर अनोळखी नंबरवरून फोन आला. त्यांनी सांगितले की तुमच्या मोबाईल सीम कार्डचे केवायसीची मुदत संपली आहे. तुम्हाला तुमचा नंबर चालू ठेवण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करून दहा रूपयाचा रिचार्ज करा असे सांगितल्यावर बठेजा यांनी त्याप्रमाणे ॲप डाउनलोड केले. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोबाइलवरील नियंत्रण मिळवत त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाईन पध्दतीने ३४ हजार २६६ रूपये काढून घेतले. यासंदर्भात हरनाम बठेजा यांनी भुसावळ पोलीसात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि गणेश धुमाळ करीत आहे.

Protected Content