अमळनेर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अक्षय कृषी परिवार आणि मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘भूमी सुपोषण अभियान’ या राष्ट्रीय चळवळीचा मासिक जनजागर सांगता सोहळा येत्या अक्षय्य तृतीयेला, म्हणजेच रविवार, १९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. श्री मंगळग्रह मंदिराच्या प्रांगणात सकाळी १०.३० वाजता अत्यंत भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणात हा भव्य सोहळा संपन्न होणार असून, याप्रसंगी समाजातील विविध क्षेत्रांतील महानुभाव आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहणार आहेत.
या अभियानाचा शुभारंभ १९ मार्च रोजी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंहजी चौहान यांच्या हस्ते झाला होता. गुढीपाडव्यापासून अमळनेर तालुक्यातील १५६ गावांमध्ये जनजागर रथाच्या माध्यमातून हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. दररोज गावागावात जाऊन शेतकऱ्यांना भूमी सुपोषणाचे महत्त्व, जमिनीचे आरोग्य आणि विषमुक्त शेतीचा उद्देश समजावून सांगण्यात आला. या एक महिन्याच्या निरंतर कार्यानंतर आता अक्षय्य तृतीयेच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एका पवित्र मुहूर्तावर या मासिक अभियानाची सांगता केली जात आहे. या सोहळ्यात कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारीही सहभागी होऊन भविष्यातील शेतीपुढील आव्हाने व सुपोषणाचे सुपरिणाम यावर मार्गदर्शन करणार आहेत.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे भूमिमातेचे पूजन. मंगळग्रह सेवा संस्थेने परिसरातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी या सोहळ्यास येताना आपल्या शेतातील ‘एक मूठ माती’ आवर्जून सोबत आणावी. सर्व शेतकऱ्यांनी आणलेली ही माती एकत्रित करून तिचे विधिवत पूजन आणि अभिमंत्रण केले जाईल. ही पवित्र माती शेतकऱ्यांनी पुन्हा आपल्या शेतात नेऊन टाकायची आहे.
याप्रसंगी शेतकऱ्यांना रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा बेसुमार वापर टाळण्याची शपथ दिली जाणार आहे. शेतजमिनीचा कस टिकवून ठेवणे आणि येणाऱ्या पिढ्यांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी नैसर्गिक शेतीकडे वळण्याचा संकल्प यावेळी केला जाईल. जमिनीची होणारी हानी थांबवून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी या पवित्र कार्यात स्वतःसह इतरांनाही सहभागी करून घ्यावे, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.



