मुंबई प्रतिनिधी | भूखंड गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना पीएमएलए कोर्टाने तीन दिवसांची म्हणजे १५ जुलैपर्यंत सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीची कोठडी सुनावली आहे.
भोसरी येथील वादग्रस्त भुखंड खरेदी प्रकरणी माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने अटक केली आहे. याआधी त्यांना पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. १२ जुलै रोजी याची मुदत संपली. या अनुषंगाने गिरीश चौधरी यांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले.
याप्रसंगी झालेल्या सुनावणीत ईडीने गिरीश चौधरी यांची चौकशी करण्यासाठी नऊ दिवसांची कोठडी मागितली. मात्र कोर्टाने त्यांना तीन दिवसांची कोठडी सुनावली. अर्थात चौधरी यांना आता १५ जुलैपर्यंत ईडीची कोठडी मिळाली आहे. या तीन दिवसांमध्ये गिरीश चौधरी यांची चौकशी करण्यात येणार आहे.
याच प्रकरणात याआधी एकनाथराव खडसे यांची देखील तब्बल नऊ तासांची चौकशी ईडीतर्फे करण्यात आली आहे. तर त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांना देखील चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत. त्यांनी ईडीकडे हजर होण्यासाठी मुदत मागून घेतली आहे.