वृध्देला मुलांनी खावटी द्यावी : प्रांताधिकार्‍यांचे आदेश

अमळनेर प्रतिनिधी | सहापैकी पाच मुलांनी आपल्या ९० वर्षे वयाच्या मातेचा सांभाळ करण्याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाचे पिठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी संबंधीत महिलेस खावटी देण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत वृत्त असे की, शहरातील गांधलीपुरा भागातील केसरबाई रमजान तेली (वय ९०) यांनी खावटी मिळण्यासाठी प्रांताधिकार्‍यांकडे अर्ज केला होता. यात म्हटले होते की, त्यांचे वय ९० वर्षे असून बाबू तेली, कांती तेली, करीम तेली, जलाल तेली व रहीम तेली ही पाचही मुले गेल्या आठ वर्षांपासून त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे केसरबाईंचा सहावा मुलगा रज्जाक तेली हा त्यांचा सांभाळ करत आहे. कोरोनामुळे तो सध्या बेरोजगार झाला आहे. त्यामुळे सर्व मुलांनी खावटी द्यावी अशी मागणी केसरबाईंनी उपविभागीय अधिकार्‍यांकडे केली होती.

या अनुषंगाने प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी सहा मुलांना नोटिसा काढून खुलासा मागवला होता. सर्वांचा खुलासा आल्यानंतर सुनावणी होऊन पाच मुलांनी वृद्ध महिलेला हयातीपर्यंत प्रत्येकी दोन हजार, तर रज्जाक याने एक हजार रुपये प्रति महिना खावटी द्यावी असा निकाल दिला. तहसीलदार व पोलिस निरीक्षकांनी आदेशाची अंमलबाजवणी करावी, असेही आदेशात म्हटले आहे. या प्रकरणात फिर्यादीतर्फे ऍड.सलीम खान यांनी काम पाहिले.

Protected Content