जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण असताना, जळगाव राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी देखील आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन केले. जळगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी आपली लाडकी ‘लाल परी’ अतिशय आकर्षकपणे सजवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोख्या पध्दतीने मानवंदना दिली.
लाल परीची सजवट आणि मिरवणूक
आज सकाळी जळगाव आगारामध्ये बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या निमित्ताने एका बसला फुलांनी आणि निळ्या ध्वजांनी सुशोभित करण्यात आले होते. ही सजवलेली बस जळगाव मुख्य बस स्थानकापासून ते रेल्वे स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत वाजत-गाजत नेण्यात आली. या मिरवणुकीने प्रवाशांचे आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

पेढे वाटून व्यक्त केला आनंद
यावेळी एसटी महामंडळाचे अधिकारी, चालक, वाहक आणि तांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणुकीदरम्यान ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. स्मारक परिसरात बस पोहोचल्यानंतर बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. या आनंदोत्सवाचे औचित्य साधून उपस्थितांना आणि प्रवाशांना पेढे वाटण्यात आले.
कर्मचाऱ्यांचा उत्साह
एसटी कर्मचाऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सण अत्यंत भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा केला. “बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आम्ही सेवा देत आहोत,” अशी भावना यावेळी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. या अनोख्या मिरवणुकीची चर्चा संपूर्ण शहरात होती.



