भावात प्रचंड घसरण झाल्याने केळी उत्पादक उतरले रस्त्यावर !

uposhan

रावेर प्रतिनिधी । तालुक्यात गेल्या १५ दिवसांपूर्वी १४०० रुपयांपर्यंत बाजारभाव असतांना १० दिवसांत ४०० रुपयांपर्यंत बाजारभाव गेल्याने केळी उत्पादक हवालदिल झाला आहे. अत्यंत मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांनी आज दि.१४ रोजी रावेर येथील छोरिया मार्केट ते तहसील कार्यालयापर्यंत शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या आवाहनानंतर स्वयंस्फूर्तीने तरुण शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभाग नोंदविला आहे.

या संदर्भात माहिती अशी की, रावेरातील छोरिया मार्केट पासून आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयापर्यंत पायी मोर्चा पोहोचल्यावर नायब तहसीलदार वैशाली देशमुख यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तरुण व संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या भावना मांडल्या. शेतकऱ्यांच्या वतीने निंभोरा येथील तरुण शेतकरी सुनील कोंडे यांनी १५ दिवसातील १४०० रुपयांवरून ४०० रुपयांपर्यंत बाजारभाव गेल्यावरही व बाजार समितीचे भाव १००० च्या वर बोर्डावर असतांना ४०० रुपयांनी खरेदी सुरू असताना प्रशासन गप्प असून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक सुरू असल्याचे यावेळी सांगितले. पिंप्री येथील जीवन जाधव के-हाळा येथील राहुल महाजन यांनी या मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी मोर्चात निंभोऱ्याचे सुनील कोंडे, गिरीश नेहेते, गुणवंत भंगाळे, योगेश कोळंबे, कोचुरचे सुनील राऊत, दसनुरचे अरविंद पाटील, देवराम महाजन, भावराव पाटील, यांसह तालुकभरातून निलेश पाटील, कांडवेलचे विजय पाटील, तुषार कचरे, लीलाधर बढे, लक्ष्मण सावळे, चंदू महाजन, यश महाजन, सचिन पाटील, दगडू महाजन, गजानन कुंभार यांसह तालुकभरातून मोठ्या प्रमाणावर तरुण शेतकरी स्वयंस्फूर्तीने उपस्थित होते.

तसेच यावेळी तहसील कार्यालयात निवेदन देतांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप पाटील, संचालक डॉ. राजेंद्र पाटील यांनी ही भरारी पथक स्थापन करून कारवाई करण्याचे व व्यपाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करण्याचे यावेळी सांगितले आहे. तर बाजरी समितीतील बैठकीत सभापती दिलीप पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, श्रीकांत महाजन, गोपाळ नेमाडे, केळी भाव समितीचे रामदास पाटील यांनी बाजार समितीची भूमिका मांडत केळीचा माल फक्त बाजार समितीतील अधीकृत व्यापाऱ्यांकडेच कापण्याचे आवाहन केले तसेच याबाबत तालुक्यातील अधिकृत व्यापाऱ्यांची यादी जाहीर करणार असल्याची माहिती दिली. यावेळी मोठ्या प्रमाणावर तरुण शेतकरी उपस्थित होते. विशेष म्हणजे या मोर्चात कोणतेही राजकीय पदाधिकारी फिरकले नाहीत. बुधवारी (दि.१८) तहसीलसमोर लाक्षणिक उपोषण-केळी बाजारभावातील तफावत दूर करून प्रशासनाने यात हस्तक्षेप करून आर्थिक पिळवणूक थांबवावी व शेतकऱ्याच्या केळी मालाला भाव मिळावा या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी दि.१८ रोजी बुधवारी रावेर तहसील कार्यालयासमोर सुनील कोंडे व तरुण शेतकरी लाक्षणिक उपोषण करणार आहेत.

Protected Content