सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त सावदा येथे भाजपा सावदा मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
स्थापना दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात गांधी चौकातील विठ्ठल मंदिरात भारत माता व पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर सामाजिक बांधिलकी जपत, सावदा येथील राजश्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले.
दुपारच्या सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑनलाईन माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज्यभर राबविण्यात आलेल्या सदस्य नोंदणी मोहिमेचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले व आगामी निवडणुकांमध्ये अधिक जोमाने काम करून विजय संपादन करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकिशोर महाजन, जिल्हा सरचिटणीस हरलाल कोळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, तालुका अध्यक्ष महेश चौधरी, जिल्हा चिटणीस रेखा बोंडे, तसेच विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.