नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारताचा महान क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारताने २०११मध्ये आयसीसी वर्ल्ड कप विजेतेपदानंतर संघातील खेळाडूंनी सचिनला खांद्यावर उचलत मैदानाची फेरी मारली होती. या क्षणाचा समावेश सर्वोत्कृष्ठ क्रीडा लॉरेन्स पुरस्काराच्या नामांकनामध्ये झाला आहे.
सचिन तेंडुलकरला सहकाऱ्यांनी खांद्यावर घेतलेल्या क्षणाला ‘कॅरीड ऑन द शोल्डर्स ऑफ ए नेशन’ असे शिर्षक देण्यात आले आहे. आजपासून ९ वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरने त्याच्या सहाव्या वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच चषक उंचावला होता. भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संघातील सहकाऱ्यांनी सचिनला खांद्यावर घेत ‘लॅप ऑफ ऑनर’ दिला होता. अनेक वर्ष देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सचिनला तेव्हा आश्रू रोखता आले नव्हते. लॉरेन्स अकादमीचा सदस्य आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने सचिन तेंडुलकर संदर्भातील या क्षणाला क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षण असल्याचे म्हटले आहे. येत्या १७ फेब्रुवारी रोजी बर्लिन येथे लॉरेन्स जागतिक क्रीडा पुरस्कार दिले जाणार आहेत.